मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणारी मॉडेल अंजुम नायर हिला मंगळवारी न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ओशिवरा पोलिसांनी सोमवारी तिला अटक केली होती. तिच्या घरात सुरू असलेल्या संगीताचा आवाज खूप मोठा असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तिच्या घरी गेले असता तिने पोलिसांनाच शिवीगाळ केली होती.

अंजुम अंधेरी पश्चिमेच्या समर्थ आंगन इमारतीत २० व्या मजल्यावर राहते. ती मॉडेल आहे तसेच दोन हिंदी चित्रपटात तिने भूमिकाही केल्या आहेत. रविवारी पहाटे २ वाजता तिच्या घरात कर्णकर्कश आवाजात संगीत सुरू होते. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्याची माहिती मिळाल्यावर बीट मार्शल घटनास्थळी गेले. त्यावेळी ती मद्यधुंद अवस्थेत होती. पोलिसांनी आवाज कमी करायला सांगताच तिने उलट पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून दंड आकारून सोडून देण्यात आले. परंतु ती अश्लील शिवीगाळ करत असल्याची चित्रफित दिवसभर मोबाईल आणि सोशल नेटकवर्किंग साइटवर फिरल्यानंतर सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी पुन्हा तिला अटक केली. तिच्यावर अश्लील कृत्य करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचे गुन्हे दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

Story img Loader