मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात मॉडेलच्या हत्या प्रकरणाची उकल केली असून मुख्य आरोपीला अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी मालाडच्या माईंड स्पेस ऑफीसजवळ एका बॅगमध्ये मानसी दीक्षित या मॉडेलचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी मानसीचा मित्र मुजम्मिल सय्यदला (२०) अटक केली आहे. मुजम्मिलने मानसची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये भरला व ती बॅग मालाडच्या माईंड स्पेस कार्यालयाजवळच्या झुडूपामध्ये फेकून दिली.

मुजम्मिलने बॅग नेण्यासाठी एक खासगी टॅक्सी बोलावली होती. त्या टॅक्सीचालकाने सर्तकता दाखवत वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस लगेच आरोपीपर्यंत पोहोचू शकले. २० वर्षीय मानसी दीक्षित मूळची राजस्थानची होती. मुंबईत ती मॉडलिंग करण्यासाठी आली होती. इंटरनेटवरुन तिची आणि आरोपी मुजम्मिल सय्यदची ओळख झाली. सोमवारी दुपारी दोघे सय्यदच्या अंधेरी येथील घरी भेटले. तिथे दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाल्यानंतर सय्यदने एक वस्तू तिच्या डोक्यात मारली व नंतर तिची गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर सय्यदने एका बॅगमध्ये मानसीचा मृतदेह भरला. अंधेरीतील आपल्या घराकडून मालाडला जाण्यासाठी त्याने खासगी टॅक्सी बोलावली. सय्यद मालाडच्या माईंड स्पेस कार्यालयाजवळच्या झुडूपामध्ये बॅग फेकून तिथून पसार झाला. दुपारी तीन ते चारच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. सय्यदने जी टॅक्सी बोलावली होती त्या टॅक्सी चालकाने पोलिसांना ही माहिती दिली. सय्यदने बॅग फेकल्यानंतर तिथून रिक्षा पकडून निघताना त्याला टॅक्सीचालकाने पाहिले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा शोधून काढली व मुख्य आरोपीला अटक केली.