मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी देखील मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० दरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १६१.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १५४.२ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार हा पाऊस अतिमुसळधार श्रेणीत येतो.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले होते. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. सोमवारी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सायंकाळनंतर पुन्हा मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपले आणि मंगळवारी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली. मंगळवारी दिवसभर मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
हेही वाचा : …तरी जयभीम नगरमधील झोपड्यांवर कारवाई का ? उच्च न्यायालयाची महापालिका, राज्य सरकारला विचारणा
गुजरात, उत्तर केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. रविवारी कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे तीव्र स्वरुपाचा होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी तो उत्तरेकडे तीव्र स्वरुपाचा झाला. याचाच परिणाम म्हणून मुंबईत अचानक मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत भायखळ्यात १६७ मिमी, माटुंगा येथे १६७.५ मिमी, शीवमध्ये १५८.५ मिमी, दहिसरमध्ये ११३ मिमी, राम मंदिर येथे १५६ मिमी, विक्रोळीत १२४ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या पावसाच्या वर्गीकरणानुसार ११५ मिमीपर्यंत म्हणजे मुसळधार तर ११५ ते २०० म्हणजे अतिमुसळधार पाऊस आणि २०० मिमीपेक्षा अधिक म्हणजे अतिवृष्टी समजली जाते.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात २ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबरच जालना, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि गडचिरोली भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे.