महाराष्ट्र आणि गुजरात यांचे नाते छोटय़ा-मोठय़ा भावासारखे असले तरी गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रापेक्षा गुजरातने विकासात जास्त प्रगती केल्याचे सूचित करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यासाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वालाच दोष दिला. मुंबईतील गुजराती भाषकांची मने जिंकतानाच मित्र पक्ष शिवसेनेचा उल्लेखही करण्याचे टाळले.
मोदी यांनी भाषणाची सुरुवातच मराठीतून केली व मुंबई आणि गुजराती भाषकांचे अतुट नाते असून, मुंबई हे तर गुजराती भाषकांचे दुसरे घर असल्याचे उद्गार काढले. महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना एकाच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत २६ मुख्यमंत्री झाले तर गुजरातमध्ये फक्त १४च मुख्यमंत्री झाल्याचे सांगत राज्याच्या नेतृत्वाला दोष दिला. गुजरातने महाराष्ट्रापेक्षा कशी जास्त प्रगती केली हे सांगताना त्यांनी चेकपोस्टचे उदाहरण दिले. महाराष्ट्र सरकारचे आच्छाड (तलासरी) आणि नवापूरला चेकपोस्ट आहेत. या दोन्ही ठिकाणी जवळच गुजरात राज्यांचे चेकपोस्ट आहेत. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राला या दोन्ही नाक्यांवर ४३७ कोटींचे उत्पन्न मिळाले. या उलट गुजरात सरकारला १४०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. हे सारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शक्य झाले. हजार कोटी रुपये गेले कोठे वा कोणी हडप केले, असा सवालही मोदी यांनी केला.
गुजरातमध्ये चोवीस तास वीजपुरवठा केला जातो, याउलट महाराष्ट्रात तासनतास भारनियमन करावे लागते. गुजरातच्या सीमेवरून ये-जा करताना महाराष्ट्र कोठे संपते आणि गुजरात कोठे सुरू होते हे लगेचच कळते. कारण महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर अंधार लागतो तर गुजरातमध्ये गावे विजेने उजळत असतात, असे सांगत मोदी यांनी महाराष्ट्राला चांगलाच टोला हाणला.
नर्मदा धरणावर दरवाजा बसविल्यास वीजनिर्मिती वाढू शकेल. हा दरवाजा बसविल्यावर महाराष्ट्राला ४०० कोटींची वीज दरवर्षी मोफत मिळणार आहे. तरीही महाराष्ट्र सरकार तयार होत नाही, असे मोदी यांनी सांगितले. त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर जनतेने दबाव आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘आदर्श’ आणि सिंचन घोटाळ्यांवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेसला यासाठी जबाबदार धरले.
भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पण मोदी यांनी तासभराच्या भाषणात शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही.