‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा शिवाजी पार्कवर प्रयोग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये जेव्हा नरेंद मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले, तेव्हा मोदीजी थेट रायगडावर आले, छत्रपतींसमोर नतमस्तक झाले. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांचे तेज हे मोदीजींनी आशीर्वादरूपाने घेतले आणि गेल्या ९ वर्षांमध्ये भारत बदलून दाखविला’, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काढले. 

भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाटय़ाच्या सहा प्रयोगांच्या मालिकेचा मंगळवारी शिवाजी पार्क मैदानात शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या महानाटय़ाचे प्रयोग १४ ते १९ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ६.४५ वाजता शिवाजी पार्क मैदानात नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. कार्यक्रमाच्या शुभारंभाला भाजपचे आमदार अमित साटम, मिहीर कोटेचा, प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय, संजय पांडे आदी उपस्थित होते. या प्रयोगाला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

 ‘आपण सगळे ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, हे खरं स्वातंत्र्य पहिल्यांदा आपल्याला महाराजांनी दिले. स्वातंत्र्याचे स्फुलिंग व विजिगीषु वृत्ती पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरित केली. यामुळेच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खऱ्या अर्थाने राज्य करतो आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करीत आहोत’, असेही फडणवीस म्हणाले.  ‘आपल्या सगळय़ांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर ते धाडस, तो पराक्रम, तो विश्वास-आत्मविश्वास आणि आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याची ताकद या कार्यक्रमातून पुन्हा जागृत होवो, एवढीच आईभवानीच्या चरणी प्रार्थना करतो’, अशा भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमासाठी सायंकाळी ५ वाजल्यापासून नागरिकांनी सहकुटुंब शिवाजी पार्कवर हजेरी लावायला सुरुवात केली होती. प्रवेशद्वारावर संबळ वादनही सुरू होते. मान्यवरांना शिवकालीन मावळय़ांची पगडी घालण्यात आली होती. तुळजाभवानी देवीची आरती व विधिवत पूजनाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने या महानाटय़ाला सुरुवात झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे निर्मित ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा हा १,११९ वा प्रयोग आहे.

विनामूल्य प्रवेशिका

 १४ ते १९ मार्च २०२३ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘जाणता राजा’ या महानाटय़ाच्या विनामूल्य प्रवेशिका दादरमधील शिवाजी मंदिर, परळमधील दामोदर नाटय़गृह, बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, मुलुंड येथील कालिदास नाटय़गृह आदी ठिकाणी उपलब्ध असतील. दररोज सुमारे १० हजार प्रेक्षकांना हे महानाटय़ पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi changed india with shivaray inspiration tribute to devendra fadanvis ysh