गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. दादर स्थानकावरुन ही ट्रेन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात घोषणा केलेली.
नितेश राणेंनी आज या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याआधीचे काही फोटो ट्विटरवरुन पोस्ट केलेत. यामध्ये गाडीवर ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष ट्रेन असं स्ट्रीकर लावल्याचं दिसत आहे. या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.
#modiexpress all set !
Ganpati bappa morya!! pic.twitter.com/53kr5TuLAW— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2021
“मोदीजींच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत,” असं मत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
“दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,” अशी माहिती नितेश राणे यांनी २२ ऑगस्ट रोजी दिली आहे. १८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात आली असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुडण्यात आली आहे. मोठ्या उत्साहामध्ये या गाडीमधील गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना गणरायाची आरती गात प्रवासाला सुरुवात केली.
#modiexpress pic.twitter.com/MHEigCGrsz
— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2021
मुंबई ते सावंतवाडी या प्रवासात मोदी एक्सप्रेसमध्ये सर्व प्रवाशांना एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार असल्याचं याआधीच सांगण्यात आलं आहे.