काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्ली विधानसभेची सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या झंझावातामुळे झाकोळलेली नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळण्याच्या चिंतेने ग्रासलेल्या भाजपला डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यातून आशेचे धुमारे फुटले आहेत. गेल्या आठवडाभरापासून प्रसारमाध्यमांच्या नजरेसमोरून गायब झालेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे पंतप्रधानांनी चढविलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात परतले असून त्याचा फायदा घेत निवडणुकीच्या फडावरील पकड कायम राखण्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे.
दिल्लीत सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर देशाचे लक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रित झाले होते. गुरुवारी विधानसभेत बहुमताची परीक्षाही सहज पार पाडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या नजरा केजरीवाल यांच्यावर पुरत्या स्थिरावल्याने, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत गायबच झाला होता. गेले काही महिने सातत्याने ‘न्यूजमेकर’ म्हणून चर्चेत असलेले मोदी मागे पडले आणि त्यांची जागा केजरीवाल यांनी घेतली. दिल्ली विधानसभेतील केजरीवाल यांच्या पहिल्या भाषणाने तर देशात त्यांच्याबद्दल आपुलकीची लाट निर्माण होणार आणि भाजपने उभे केलेले ‘नमो वादळ’ वाहून जाणार अशी भीती भाजपच्या गोटात व्यक्त होऊ लागली होती. या लाटेचा मुकाबला करण्याच्या चिंतेत असतानाच, मोदी पंतप्रधान झाले तर ती देशापुढील सर्वात मोठी आपत्ती ठरेल असे विधान करून पंतप्रधानांनी राजकीय वादळ माजविले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून स्वत: माघार घेताना डॉ. सिंग यांनी माजविलेल्या या वादळामुळे भाजपच्या आक्रमक आव्हानास आता काँग्रेसला तोंड द्यावे लागणार आहे.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर लगेचच त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियामधून पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता, केजरीवाल यांच्या प्रभावामुळे काहीसा संथ झालेल्या मोदी प्रवाहास पुन्हा जोर चढणार असे दिसू लागले आहे. केजरीवाल यांच्यामुळे मोदी प्रसिद्धीच्या पडद्याआड जात असल्याच्या चिंतेने भाजपला ग्रासले होते, तेव्हा काँग्रेसमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आपला शत्रू परस्परच नामोहरम होत असल्यामुळे सुखावलेल्या काँग्रेसला पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे धक्का मिळाला आहे. मोदी यांना पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणून पंतप्रधानांनीच त्यांना केजरीवाल यांच्या वादळातून बाहेर काढल्याची भावनाही मोदी यांच्या ट्विटर-फेसबुक पाठीराख्यांमध्ये व्यक्त होत आहे.
ही अपयशाची कबुली :भाजपची टीका
नवी दिल्ली:भ्रष्टाचारी नसण्यासाठी दुसऱ्यांदा सत्तेत येणे हाच एकमेव निकष असेल, तर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी दिले. मोदी पंतप्रधान झाल्यास देशावर महासंकट कोसळेल, या विधानावरून जेटली यांनी पंतप्रधानांवर कडाडून हल्ला चढविला. पंतप्रधानांची आजची पत्रकार परिषद म्हणजे अपयशाची कबुली असल्याचेही ते म्हणाले. केवळ तर्काच्या आधारे पंतप्रधानांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. येणारा काळ व इतिहास उत्तर देईल, असे गुळगुळीत उत्तर दिले की साऱ्या समस्यांचे समाधान झाले, असेच पंतप्रधानांना वाटते. दुसऱ्यांदा सत्तेत आल्याने भ्रष्टाचाराचे पापक्षालन झाल्याचा दावा पंतप्रधान करतात. त्या धर्तीवर गुन्हेगाराने एखादी निवडणूक जिंकली तर त्यालाही निदरेष ठरवावे लागेल, असा टोला जेटली यांना लगावला. जेटली म्हणाले की, निरपराध असतानादेखील सलग अकरा वर्षे चौकशीला सामोरे जाणारे मोदी हे स्वतंत्र भारतातील एकमेव नेते आहेत. पोलीस, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी समितीने मोदींची चौकशी केली. त्यानंतरही मोदीच सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे.
भाजपवरील केजरीवाल वादळाचे सावट पंतप्रधानांमुळे विरले ..
काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्ली विधानसभेची सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या झंझावातामुळे झाकोळलेली नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळण्याच्या चिंतेने ग्रासलेल्या
First published on: 04-01-2014 at 03:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi get place in media after manmohan singh attacks