मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी दिलेल्या हमीनुसार महिला आणि तरुणांचे सक्षमीकरण होईलच, त्याचबरोबर उत्तर मुंबई हे विकासाचे सर्वोत्तम उदाहरण ठरेल, असे प्रतिपादन उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी मालाड येथे भाजपच्या विधानसभा कार्यालय उद्घाटनप्रसंगी बुधवारी केले.
उत्तर मुंबईत लवकरच एक हजार खाटांचे अतिविशेषोपचार (सुपरस्पेशालिटी) रुग्णालय सुरू होणार असून त्याचा फायदा नागरिकांना होईल, असे गोयल यांनी नमूद केले. गोयल यांनी चिंचोली परिसरातून प्रचारफेरी काढली. त्यात खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्व धर्म आणि राज्यांमधील जनतेचे मोदी यांना समर्थन असून त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांमुळे जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते पुन्हा मोदी यांना भरभरून आशीर्वाद देतील, असा मला विश्वास आहे, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. एक मुंबईकर म्हणून मला मुंबईच्या समस्यांची सखोल माहिती आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दुर्बल घटकांसाठी आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टयांचा पुनर्विकास आणि पुनर्वसन करण्याची हमी देत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. ही प्रचार फेरी चिंचोलीपासून नाडियादवाला कॉलनी, सोमवार बाजार, भंडारवाडा नाका, लिबर्टी गार्डन, भाद्रण नगर, गोरसवाडी, डॉमनिक लेन, आर्लेम चर्चमार्गे मार्वेपर्यंत काढण्यात आली.