गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना देशाच्या राजधानीत भेटल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाकारले असले तरी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राष्ट्रवादीने यावे यासाठी भाजपतील तीन ज्येष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र त्याचवेळी अन्य तिघांचा या प्रस्तावास विरोध असून या संभाव्य समीकरणास शह देण्यासाठीच इचलकरंजीत घाईघाईने संयुक्त मेळावा घेउन पाच पांडवांचा एकीचा बनाव रचण्यात आला, असे स्पष्ट होत आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह, माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि खुद्द नरेंद्र मोदी हे या नव्या भिडूस सहभागी करून घेण्यासाठी उत्सुक आहेत तर गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीशी सलोख्यास विरोध आहे.
पवार-मोदी यांच्यातील भेटीचे वृत्त शुक्रवारी ‘लोकसत्ता;त प्रकाशित होताच राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली. पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलनाता दिल्लीत अशी काही भेट झाल्याचा ठाम इन्कार केला. या भेटीच्या वृत्ताचे पडसाद राष्ट्रवादीपेक्षाही अधिक तीव्रपणे सेना-भाजपच्याच कळपात उमटले आणि त्या निमित्ताने विरोधी पक्षांतील मतभेदांचेच दर्शन झाले. भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसला निर्णायकरित्या पराभूत करता यावे यासाठी प्रसंगी राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागली तरी घ्यावी, असा मतप्रवाह पक्षात बळावू लागला आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादीची कुमक घेता आल्यास रालोआची काँग्रेसविरोधी आघाडी अधिक सक्षम होईल, असे आग्रही प्रतिपादन नितीन गडकरी यांनी भाजपत केले असून या मुद्यावर त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांचे मन वळवल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसही जर आपल्या बाजूने आली तर महाराष्ट्रातील ४८पैकी किमान ४२ वा अधिक जागा रालोआच्या पदरात पडतील अशा स्वरूपाच्या बेरजा गडकरी यांच्या गोटातून मांडल्या जात आहेत. या संदर्भात त्या गटासमोर दोन लहानमोठे अडथळे आहेत. लहान अडथळा हा शिवसेनेचा आणि मोठा अडथळा गोपीनाथ मुंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा.
याच मुद्यावर शिवसेनेस राजी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांना अलिकडेच नवी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याची माहिती एका अन्य भाजप नेत्याने दिली. उध्दव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीत त्यांच्यात आणि भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यात याच अनुषंगाने चर्चा झाल्याचे एका दिल्लीस्थित भाजप नेत्याने सांगितले. उध्दव ठाकरे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठीदेखील असेच अनपेक्षितपणे गुजरातेत जाऊन आले. त्या भेटीचे प्रयोजनही हेच होते, असे कळते. मात्र, शिवसेना या क्षणी राष्ट्रवादीच्या प्रश्नावर गोंधळलेली आहे. सेनेसाठी लोकसभेपेक्षा आगामी विधानसभा निवडणुका महत्वाच्या असून त्या निवडणुकांनंतर काँग्रेस आणि राज ठाकरे यांना दूर ठेवण्यासाठी वेळ पडली तर राष्ट्रवादीकडे मदत मागावी, पण आता नको, अशी सेनेची भूमिका आहे.
भाजप नेत्यांच्या मते शिवसेनेपेक्षाही मोठा अडथळा आहे तो मुंडे आणि शेट्टी यांचा. या दोघांचाही राष्ट्रवादीकडे मदत मागण्यास तीव्र विरोध आहे. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा विचार जरी केला तरी आपण रालोआचा त्याग करू, इतकी ताठर भूमिका शेट्टी यांनी घेतल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या मुद्यावर या दोघांच्या बरोबरीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील मुंडे आणि शेट्टी यांच्यासमवेत आहेत. परिणामी याच राष्ट्रवादी-विरोधी मंडळींनी भाजप, सेना, रिपब्लिकन, स्वाभिमानी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यातर्फे रालोआच्या प्रचाराचा मुहूर्त घाईघाईने उरकून टाकला. इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेत त्याचमुळे पाच पांडवांची भाषा करण्यात आली, याकडे एका सेना नेत्याने लक्ष वेधले. या पाच पांडवांत आता आणखी कोणी सहावा नको असे सूचक वक्तव्य या सभेत अनेकांनी केले ते याच उद्देशाने.
यातील महत्वाचा भाग हा की विरोधकांच्या या नेत्रपल्लवीस पवार यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. विरोधकांच्या अध्र्यापेक्षाही कमी हळकुंडाने पिवळे होण्यास पवारांनी काहीशी नापसंतची दाखवली असून आपले पत्ते ते निवडणुकांनंतरच उघड करतील, अशी चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा