शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर २०२३ सत्र २ मुंबईत होत आहे. या शिबिरातून माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट यांच्यापासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वांवर घणाघात केला आहे. वरळी येथील सरदार वल्लभाई पटेल संकुल येथे शिबीर सुरू असून येथून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे.
“सरकारला सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये दाखवा”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. “मला संताप एका गोष्टीचा येतो, उपरे नेते आपल्या घरात दमदाट्या करतात, आपल्या घरात येऊन फोडापोडी करतात, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही नामर्दाची औलाद नाही”, असा घणाघात त्यांनी केला.
“संजय आता म्हणाले की स्टॅलिलने जो इशारा दिला आहे तो आता मी नुसतं म्हटलं तर तत्काळ महाराष्ट्रात अंमलात येऊ शकतो, एवढी तादक शिवसेनेची आहे. सत्तेची मस्ती ही आहे. हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे, तो फुगा फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती दाखवयाची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. जा तिकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे अधिकारी जाताहेत का बघा आणि गेले तरी परत येतात बघा. जाळून टाकतील तिकडे त्यांना”, असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला.
“मणिपूर पेटलेलं आहे. अगदी अमित शाहांनाही कोणी जुमानत नाही. काय केलं अमित शाहांनी तिथे जाऊन? मोदी अमेरिकेत चाललेत, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाहीत. विश्वगुरु अमेरिकेत जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार. पण मणिपूर हे माझ्या देशातील एक राज्य आहे. रशियन-युक्रेनचं युद्ध तुम्ही थांबवलंत ही भाकड कथा सांगितली. ही भाकड-कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा जा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, मग त्यानंतर लोक त्यांचं ऐकतात का ते पाहू. त्यासाठी मनात आग पेटायला पाहिजे”, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे.