मुंबई : ‘गाण्यातून कलाकाराची अनुभूती, मनोभूमिका ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचते आणि त्याच्या मनावर परिणाम करते. ‘स्वान्त: सुखाय, बहुजन हिताय’ या पध्दतीने गायली जाणारी गाणी निव्वळ मनोरंजनापलिकडे जात ऐकणाऱ्यावर कळत नकळत संस्कार घडवतात. आशा भोसले यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी गायलेली गाणी, त्यांचे संगीत हे भक्तीचा, देशभक्तीचा संस्कार घडवणारे आहे. आपले गाणे लोकांंसमोर अशाप्रकारे जावे जेणेकरून त्याचा परिणाम त्यांच्या मनुष्यत्वाला, राष्ट्रीयत्वाला, व्यक्तित्वाला अनुकूल असा होईल याचे भान जपणारे हे गायक – संगीतकार आहेत’, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना त्यांनी आशा भोसले यांच्या गाण्याचे भरभरून कौतुक केले.

प्रसिध्द गायिका, पद्मविभूषण आशा भोसले यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा प्रवास उलगडणाऱ्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या समारंभात करण्यात आले. प्रसिध्द गायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, मंगेशकर कुटुंबीय अशा चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आशा भोसले यांच्यावर लिहिलेले ९० लेख, तसेच आशा भोसले यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेले हे पुस्तक सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, आशा भोसले, गायक-संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ‘गाण्यावर आपला अभ्यास नाही, परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनावर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार होतात. त्यातून गाण्यांची तान घेता येत नसली, तरी उत्तम गाणे ऐकण्यासाठी कान तयार झालेला असतो. गाण्यांमधून कळत नकळत होणाऱ्या या संस्कारातूनच पुढे आपल्या आवडी-निवडींवरही परिणाम होत असतो. तसाच संस्कार मंगेशकर कुटुंबियांच्या गाण्यातून आपल्यावर झाला आहे’ अशी भावना भागवत यांनी व्यक्त केली.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Actor Sachin Pilgaonkar is coming to Yavatmal on Wednesday to appreciate Geet Ranjan
यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला अभिनेता सचिन येणार
Sankarshan Karhade Political Poem video viral
छत्रपती शिवाजी महाराजांकडे गृहखातं, तर तुकोबा अर्थमंत्री…; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कवितेतून पांडुरंगाला साद, व्हिडीओ व्हायरल
Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
aishwarya narkar shares diwali padwa video
नारकर जोडप्याचा दिवाळी पाडवा! अविनाश यांनी बायकोला काय गिफ्ट दिलं? ऐश्वर्या व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”

हेही वाचा >>>ईडीकडून मुंबई आणि जौनपूरमध्ये मालमत्ता जप्त; ४.१९ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त

‘धर्म म्हणजे पूजा नव्हे, समाजाला जोडून ठेवणारे, चांगल्याकडे नेणारे, उन्नत करणारे अनुशासन म्हणजे धर्म. तो धर्म सगळ्यातच सत्य शोधू पाहणारी प्रवृत्ती आणि सत्याशिवाय कशाचाच ध्यास नसलेली निवृत्ती अशा दोन मार्गांनी जातो. गाणे हे माणसाला सूरांच्या रुपात निवृत्तीच्या अंगाने घेऊन जाते, तर प्रवृत्तीच्या मार्गाने त्याच ठिकाणी आणून सोडणारे असते. आशाताईंचे गाणे हे प्रवृत्तीच्या अंगाने जाणारे आहे. त्यांच्या गाण्यातून आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक सकारात्मक उर्जा मिळते. ती यापुढेही मिळत राहावी यासाठी त्यांचे गाणे सतत सुरूच राहिले पाहिजे’ अशा सदिच्छाही डॉ. मोहन भागवत यांनी आशाताईंना दिल्या. यावेळी पारंपरिक पध्दतीने ९१ दिव्यांची ओवाळणी करत मंत्रघोषात आशा भोसले यांचे औक्षणही करण्यात आले.

नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात गाणी गात, दिलखुलास पध्दतीने आपल्या गाण्यांमागचे किस्से, आपल्या गळ्यावर प्रयोग करणारे वेगवेगळे संगीतकार, त्यांच्या गाण्याच्या तऱ्हा ऐकवत आशा भोसले यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील जादू पुन्हा एकदा रसिकांना दाखवून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबर पहिल्यांदा झालेल्या भेटीत त्यांनी वडिलांसारखे गाऊन दाखवण्याची आज्ञा केली. त्यावेळी ‘परवशता पाश दैवे’ हे गाणे ऐकवल्यानंतर अजून मेहनत करावी लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती, याची आठवण आशा भोसले यांनी सांगितली. पुढे एकेकाळी लहान भाऊ म्हणून कडेवर घेऊन फिरणाऱ्या ह्रदयनाथ मंगेशकर यांनीही मोठेपणी अनवट, अवघड चालीची गाणी आपल्याकडून कशी गाऊन घेतली, बाबुजी, यशवंत देव, हिंदीतही गाणी गाऊन घेणारे आर. डी. बर्मन, मदन मोहन, रोशन अशा संगीतकारांच्या प्रयत्नांतूनच आपल्यातील गायिका घडत गेली, असे त्यांनी सांगितले. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनीही आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिला.

या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील विचारांचे दैवत मोहन भागवत आणि स्वरांचे दैवत आशा भोसले अशा दोघांबरोबर एकाच व्यासपीठावर अद्वितीय क्षण अनुभवण्याची श्रीमंती आपल्याला लाभली, अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली. यावेळी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी हातभार लावणाऱ्या आणि उपस्थित मान्यवरांना शेलार यांच्या हस्ते ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला अशोक सराफ – निवेदिता सराफ, गायक सुरेश वाडकर, सोनू निगम, गायक-संगीतकार श्रीधर फडके, गायक रवींद्र साठे, गायिका अनुराधा पौडवाल, पद्माजा फेणाणी, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, गायक सुदेश भोसले, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लाँ आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.