मुंबई : ‘‘आत्मियता असली की समाज जोडून राहतो आणि कलियुगात संघशक्ती आहे. एकत्र राहणे ही सर्वात मोठी शक्ती आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून सर्वजण जात, पात, धर्म विसरून देशासाठी एकवटले आहेत. परंतु हे प्रसंगाने झाले आहे, त्यामुळे देशासाठी एकत्र येणे हा स्वभाव झाला पाहिजे आणि हा स्वभाव झाल्यानंतर कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही होणार नाही. मात्र कोणी पाहिले तर डोळा फुटल्याशिवाय राहणार नाही’’, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यामाने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या स्मृतिदिन सोहळ्याचे आणि चौथ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचे गुरुवार, २४ एप्रिल रोजी मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष व उद्याोगपती कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पुरस्कारांचे वितरण केले. तसेच पुरस्कार सोहळ्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘सारं काही अभिजात’ या कार्यक्रमाचेही सादरीकरण करण्यात आले.
‘जेव्हा वेगळेपणाला धरून काही चालते, तेव्हा त्यातून भांडणे उत्पन्न होतात. अपरिहार्यपणे अंतर वाढते. परंतु जेव्हा एकतेच्या सूत्राला धरून चालतो, तेव्हा अपरिहार्यपणे आपलेपणा वाढतो. धर्म ज्याला म्हणतात, त्याचे मूळ आपलेपणा आहे. जगात एकच धर्म मानवतेचा आहे आणि या मानवता धर्मालाच आजकाल हिंदू धर्म म्हणतात’, असे उद्गारही मोहन भागवत यांनी काढले.
‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे आणि हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मिळणे हा व्यक्तिगत सौभाग्याचा क्षण आहे. गेल्या अनेक दशकापासून भारताची सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्याचे काम मंगेशकर कुटुंबीयांनी केले. या सर्व पुरस्कारामागे माझ्या सर्व सहकाऱ्यांची निष्ठा आणि खंबीर पाठिंबा आहे, त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो’, अशाी भावना कुमार मंगलम बिर्ला यांनी व्यक्त केल्या.
‘काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्यामुळे अनेकांनी स्मृतिदिन सोहळा रद्द होणार का? असे फोनवरून विचारले. मात्र मागे हटण्याची आपली संस्कृती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की त्यांना गाडू आणि या गाडण्याला हातभार लावू, ही आमची संस्कृती आहे. तसेच मंगेशकर कुटुंब हे हिंदुत्वनिष्ठ आहे आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिन सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून येणे हा सुवर्णयोग आहे’, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रास्ताविक मांडताना सांगितले.
‘गेल्या काही महिन्यांमध्ये विविध घटना समोर आल्या आहेत. कोणाचाही अपघात होऊ नये. सर्वांना योग्य प्रकारची रुग्णव्यवस्था मिळावी, याबद्दल दुमत नाही. परंतु एका अपघातामुळे मंगेशकर कुटुंबीयांच्या नावाने टाहो फोडून काहीही बोलणाऱ्या आणि शिव्या देणाऱ्या सगळ्यांचा मी निषेध करतो’, असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगत अप्रत्यक्षपणे कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराचे मानकरी
● संगीतक्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : व्हायोलिन वादक एन. राजम
● उत्कृष्ट नाट्यनिर्मिती २०२४-२५ मोहन वाघ पुरस्कार : ‘असेन मी नसेन मी’ नाटक
● समाजसेवेसाठी आनंदमयी पुरस्कार : आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रेन संस्था
● साहित्यक्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी वाग्विलासिनी पुरस्कार : लेखक व समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस
● नाट्य- चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी पुरस्कार : अभिनेते शरद पोंक्षे
● नाट्य- चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी पुरस्कार : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
● हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी पुरस्कार : अभिनेते सचिन पिळगावकर
● भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी पुरस्कार : अभिनेत्री श्रद्धा कपूर</p>
● भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी पुरस्कार : अभिनेते सुनील शेट्टी
● संगीतक्षेत्रातील सेवेसाठी उदयोन्मुख गायिका पुरस्कार : गायिका रीवा राठोड
(आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष व उद्याोगपती कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.)