‘आमच्या देशात पूजेला महत्व दिले जात नाही. पण इस्लाम आक्रमणाच्या वेळी पूजेचे महत्व आम्हाला समजले,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. ‘धर्म म्हणजे पूजा नाही, धर्म म्हणजे स्वभाव आणि कर्तव्य यांची सांगड घालून वागणे. विविधतेतून एकात्मता हे भारतीयांचे वैशिष्ठय़ आहे. सावरकरांनी हिंदू शब्दाला चिकटलेला संकुचित अर्थ दूर केला, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
स्वा.सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्ताने सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. ‘इंग्रजांनी ‘रिलीजन’ म्हणजे धर्म समीकरण केले होते. पण इस्लाम आक्रमकणाच्या वेळी पूजा महत्वाची समजले. आम्ही दुसऱ्यांची पूजा बदलत नाही. पण इतरांनी त्यांची पूजेची पध्दत आमच्यावर लादण्याच प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला धक्का बसला, असे भागवत यांनी सांगितले.
सावरकरांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, पण त्यांचे नाव स्वातंत्र्यानंतर खटल्यात गुंतविले गेले. अंदमानात त्यांच्या नावाची पाटी उतरविली गेली. त्यांनी कधीही कोणालाही दूषणे दिली नाहीत. त्यांच्या भाषणातील शब्दांमध्ये आणि लिखाणातील अक्षरांमध्ये जी शक्ती आहे. त्यांचा आदर्श ठेवून आपण जगू शकतो का, याचा विचार प्रत्येकाने करुन आचरणाचा प्रयत्न केला पाहिजे. स्वा. सावरकरांनी स्वातंत्र्य आणि कालसुसंगत विचार या दोन तत्वांच्या आधारे आपली वैचारिक मांडणी केली. स्वातंत्र्य म्हणजे ‘स्व’ चे तंत्र. प्राचीन परंपरेतून चांगले घ्यावे, ही कालसुसंगत संकल्पना होती.
यावेळी माजी आमदार जांबुवंतराव धोटे, अरुण जोशी यांची भाषणे
झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा