मुंबई : खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोदा पटेल यांच्यासह नऊ जणांविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. पटेल यांच्यासह अन्य आरोपींनी डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात पटेल यांच्यासह नऊजणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने गुरुवारी या याचिकांवर निर्णय दिला. पटेल यांच्यासह नऊ जणांविरोधातील गुन्हा रद्द केला. पटेल यांच्यासह जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलीस अधीक्षक, उप जिल्हाधिकारी यांचवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरिन ड्राईव्ह येथील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत डेलकर यांचा मृतदेह सापडला होता. पटेल यांच्यासह नऊजणांकडून डेलकर यांची छळवणूक सुरू होती. त्यांच्याकडून डेलकर यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांच्या मुलाने पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पटेल यांच्यासह नऊ जणांवर डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे राज्य सरकारने गेल्या वर्षी म्हटले होते.