बनावट मतपत्रिकांचा गैरप्रकार तसेच सुरुवातीपासून उमेदवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मोहन जोशी विराजमान झाले. अनेक वादविवादांमुळे यंदाची नाटय़ परिषदेची निवडणूक चांगली गाजली. मोहन जोशी यांना २८, तर विनय आपटे यांना १५ मते मिळाल्याची माहिती दीपक करंजीकर यांनी दिली. आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्यात आली. दरम्यान, अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आश्वासनांची सौदेबाजी झाल्याचा आरोप विनय आपटे यांनी केला आहे.
नाटय़ परिषदेच्या उपाध्यक्षपदी नागपूरचे प्रमोद भुसारी यांची निवड करण्यात आली असून प्रमुख कार्यवाहपदी दीपक करंजीकर यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी लता नार्वेकर यांची, तर सहकार्यवाहपदी भाऊसाहेब भोईर आणि रत्नागिरीचे सुनील वणजू यांची निवड करण्यात आली आहे.
बनावट मतपत्रिका प्रकरण
नाटय़ परिषदेच्या मुंबई पॅनलच्या निवडणुकीत झालेल्या बनावट मतपत्रिकांच्या गैरप्रकाराबात पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र यात प्रतिष्ठित लोकांचा सहभाग असल्यामुळे बनावट मतपत्रिका प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देता येत नाही, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र इतर अनेक प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणदेखील अनेक वर्षे चौकशीच्या चक्रात अडकणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एका रात्रीत काय घडले?
शनिवापर्यंत विनय आपटे पॅनलकडे झुकते माप असलेल्या नागपूरच्या प्रतिनिधींनी रविवारी मात्र विरुद्ध बाजूने मतदान केल्यामुळे अख्ख्या निकालाचे पारडे फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका रात्रीत नेमके काय घडले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आता प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न – जोशी
नाटय़ परिषदेची आणि कलाकारांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी यापुढे काम करणार आहे. अनेक योजना डोक्यात आहेत.
स्वस्थ बसणार नाही – विनय आपटे
बनावट मतपत्रिकांचा प्रकार घडल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांचे आजवर पालन केले आहे. मात्र आता प्रक्रिया पूर्ण झाली असून आम्ही स्वस्थ बसणार नाही.
नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा मोहन जोशी
बनावट मतपत्रिकांचा गैरप्रकार तसेच सुरुवातीपासून उमेदवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मोहन जोशी विराजमान झाले. अनेक वादविवादांमुळे यंदाची नाटय़ परिषदेची निवडणूक चांगली गाजली.
First published on: 25-03-2013 at 04:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan joshi again president of drama council