घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या ‘फुकट’ प्रसारणाचा मुद्दा आता तापत चालला आहे. हे साहित्य संमेलन जर फुकट दाखविणार असाल तर अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन, विद्रोही साहित्य संमेलनाचेही मोफत प्रक्षेपण करा, असा सूर नाटय़ परिषदेचे मोहन जोशी आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे सुबोध मोरे यांनी लावला आहे.
घुमान साहित्य संमेलनाचे उद्घाटन व समारोप सोहळ्याचे दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून मोफत  प्रसारण केले जाणार असेल तर आमच्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या प्रसारणासाठीही यापुढे कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. तर विद्रोही साहित्य संमेलन आणि राज्यातील साहित्य संमेलनांचे प्रसारणही अशाच प्रकारे मोफत करण्याची मागणी विद्रोही साहित्य संमेलनाचे संस्थापक सदस्य सुबोध मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
नाटय़ संमेलन सोहळ्याचे प्रसारण दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीवरून गेली काही वर्षे शुल्क घेऊनच केले जात होते. बेळगाव येथे नुकतेच झालेले नाटय़संमेलन हे ९५ वे होते, तर घुमानला होणारे साहित्य संमेलन ८८ वे होते. म्हणजे साहित्य संमेलनाला आम्ही एका अर्थाने ‘वडील’ आहोत. मानाने मोठे आहोत. त्यामुळे शुल्क न आकारता प्रसारण करण्याची नवी प्रथा सुरू करायची असेल तर पुढच्या वर्षी नाटय़ संमेलनही तसेच फुकट दाखवा, असे मोहन जोशी म्हणाले. बेळगाव येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या वेळी त्याच्या प्रसारणाबाबत ना आम्ही दूरदर्शनला विचारले आणि ना दूरदर्शनने आम्हाला विचारले. त्यामुळे यंदा आम्ही हे प्रसारण एका खासगी वाहिनीमार्फत केले असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विद्रोहीसह अन्य साहित्य संमेलने दरवर्षी होतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच सर्व साहित्य संमेलने दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून फुकट दाखवावीत, असा आग्रह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ राज्याच्या सांस्कृतिक कार्य खात्याकडे धरणार का, त्यासाठी भांडणार का, असा सवालही मोरे यांनी  केला.
शेखर जोशी, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा