मोहन रावले यांचा विषय शिवसेनेसाठी संपला असून यावर आता अधिक बोलण्यासारखे काहीही नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बंडखोरांचे काय होते ते तुम्ही पाहिले, असे सांगून पक्षविरोधी कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही उद्धव यांनी दिला.
शिवसेना हा दलालांचा पक्ष होत चालल्याचे सांगून उद्धव यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर मोहन रावले यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. त्यानंतर तात्काळ रावले यांच्या हकालपट्टीची घोषणा सेनानेते खासदार संजय राऊत यांनी केली. मंगळवारी मातोश्रीवरील एका कार्यक्रमात बोलताना, मोहन रावले हा विषय आमच्यासाठी संपला असून असल्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे उद्धव यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पक्षनेतृत्वावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांनी पक्षातून खुशाल बाहेर जावे, अशी तंबीही उद्धव यांनी दिली होती. त्यानंतर शिवसेनानेते मनोहर जोशी यांनी सपशेल शरणागती पत्करत लेखी माफी मागितली.
तर रावले यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव व मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागली. रावले यांच्या उघड बंडाची तात्काळ दखल घेऊन त्यांची हकालपट्टी करण्यात आली असली तरी रावले यांनी बाळासाहेबांच्या स्मारकापासून नार्वेकरांच्या हस्तक्षेपाबाबत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना उत्तर देण्याचे टाळले.
मोहन रावले यांनी बाळासाहेबांच्या स्मारकापासून नार्वेकरांच्या हस्तक्षेपाबाबत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना उत्तर देण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा