मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होत आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसैनिक दादर परिसरात दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील केसनंद गावातील शिवसैनिक मोहन यादव यांनी थेट मोटारसायकलीने दादर गाठले आहे. विशेषतः शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजलेली ही मोटारसायकल सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून बहुसंख्य शिवसैनिक मोटारसायकलसोबत छायाचित्रे काढण्यात मग्न आहेत.
मोहन यादव यांनी संपूर्ण मोटारसायकल ही शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजवलेली आहे. या मोटारसायकलवर मोहन यादव यांनी मशाल चिन्हाची प्रतिकृती, भगवे झेंडे, झेंडूच्या फुलांचे तोरण, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतची छायाचित्रे आणि भेटीच्या आठवणींचा उल्लेख शिवसेनेच्या समर्थनार्थ विविध घोषणा असलेले फलक आदींनी आणि छायाचित्रांनी ही मोटारसायकल सजवलेली असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मोहन यादव यांनी ही मोटारसायकल २८ वर्षांपूर्वी सजवली असून ते मोटारसायकलद्वारे शिवसेनेचा प्रचार करीत असतात.
हेही वाचा >>>भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…; शिवाजी पार्क परिसरात फलकबाजी
‘बाळासाहेब ठाकरे यांची वक्तृत्व शैली आणि निर्भिड नेतृत्वामुळे प्रेरित होऊन शिवसेनेत सामील झालो. शिवसेनेचे विचार आणि कार्य राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींचा समावेश असलेल्या गोष्टींनी मोटारसायकल सजवली. त्यानंतर ही मोटारसायकल राज्यासह देशाच्या विविध भागात, तसेच अयोध्येलाही घेऊन गेलो. उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेला आवडणारे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बहुसंख्य आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे सरकार येईल. महायुतीला मोठा धक्का बसेल’, असे मत मोहन यादव यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>Mulund Assembly Constituency : गुजराती-मराठी वादात कोण मारणार बाजी? भाजपाच्या गडाला मविआ लावणार का सुरुंग?
मातोश्रीवर भेट, बाळासाहेब ठाकरेंकडून कौतुक व गप्पा
मोहन यादव हे २००३ साली मातोश्री निवासस्थानी मोटारसायकल घेऊन गेले होते. तेव्हा शिवसेना पक्षाला वाहिलेली ही मोटारसायकल खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेस पडली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीच्या बाहेर येऊन मोहन यादव यांची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि भरभरून कौतुकही केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेली ही भेट कायम आठवणीत राहील. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते स्वतः येऊन भेटले आणि त्यांना माझा खूप अभिमान वाटला, माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे. उद्धव ठाकरेही नेहमी आपुलकीने विचारपूस करतात, कौतुक करतात, अशी भावना मोहन यादव यांनी व्यक्त केली.