रुग्णालयातील उद्वाहनातून जात असताना रुग्णाच्या नातेवाईकाने विद्यार्थी परिचारिकेचा विनयभंग करण्याची घटना नायर रुग्णालयात घडली. मात्र या विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिल्याने संबंधित व्यक्तीला सोडून देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या तिसऱ्या वर्षांला शिकत असलेली ही विद्यार्थिनी परिचारिका २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उद्वाहनातून जात होती. त्या वेळी वॉर्ड क्रमांक १२ मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने तिच्याशी गैरवर्तन केले. पालिका रुग्णालयांच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी याबाबत तातडीने पावले उचलली व सुरक्षारक्षकांनाही सूचना दिल्या. सोमवारी दुपारी नातेवाईकाला भेटायला आलेला असताना सुरक्षारक्षकांनी त्या पुरुषाला पकडले व आग्रीपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
‘परिचारिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाबाबत नेहमीच हेळसांड केली जाते. या मुलीने झाल्या प्रकाराची माहिती दिल्याने त्याबाबत कारवाई तरी करता आली. परिचारिका या संदर्भात आंदोलनही करणार होत्या. मात्र या मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला व पोलिसांना त्याला सोडावे लागले,’ असे म्युनिसिपल नर्सिग अ‍ॅण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या सेक्रेटरी त्रिशाला कांबळे म्हणाल्या.

Story img Loader