मालाड मध्ये सोमवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुणीचा तसेच महिलेचा विनयभंग करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. विनयभंगाच्या पहिल्या घटनेत उपनगरात काम करणारी एक २१ वर्षीय तरुणी रात्री साडेआठ वाजता कामावरून आपल्या मित्रासोबत घरी जात होती. एसव्ही रोड येथील न्यू ईरा सिग्नलजवळ चार तरुणांनी तिच्या कपडय़ांवरून शेरेबाजी करीत तिच्याशी रस्त्यातच लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मित्रालाही चौघांनी धक्काबुक्की केली. त्या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निलेश ठकार याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.  दुसरी घटना शनिवारी रात्री मालाडच्या इन ऑर्बिट मॉलजवळ घडली. कांदिवलीच्या लालजीपाडा येथे राहणारी महिला मालाड येथे कामानिमित्त गेली होती. रात्री ८ च्या सुमारास तिला तिच्या परिचयाचा निरंजन सिंग नावाचा तरुण भेटला. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने तिला आपल्या गाडीत बसवून तिला मॉलच्या मागे नेऊन गाडीतच तिचा विनयभंग केला. या महिलेने मालाड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी निरंजन सिंग याला अटक केली.