महिलांवरील अत्याचाराविरुद्ध जोरदार आघाडी उघडल्याचा दावा एकीकडे शासनाकडून केला जात असला तरी ठाणे गृहरक्षक दलातील एका महिला अधिकाऱ्याला प्रभारी समादेशकाविरुद्ध विनयभंगांची तक्रार दिल्यामुळे सुरुवातीला मनस्तापाला सामोरे जावे लागले. आता तर तिला थेट सेवामुक्तच करण्यात आले आहे.
ठाणे गृहरक्षक दलातील पलटन नायक असलेल्या या महिला अधिकाऱ्याला बंदोबस्ताच्या वेळी प्रभारी समादेशक प्रबोध कोल्हटकर यांनी अपशब्द वापरले तसेच तिचा विनयभंग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या या अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे दाद मागितली. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. आपल्या वरिष्ठाविरुद्ध हिंमत दाखविणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला पाठिंबा देण्याऐवजी तिच्याविरुद्ध खोटे जबाब नोंदवणे सुरू झाले. या महिला अधिकाऱ्याने प्रभारी समादेशकाच्या कानशिलात लगावली, असा आरोप करणाऱ्या एका महिला जवानाची साक्षही नोंदविण्यात आली. त्यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याने महासमादेशक श्रीदेवी गोयल यांच्याकडे धाव घेतली. परंतु वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विजय पवार यांनी त्यांना श्रीमती गोयल यांना भेटू दिले नाही. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी महासमादेशकांना दिले. परंतु त्याआधीच या महिला अधिकाऱ्याला सेवामुक्त करण्यात आले.