मुंबई : शिवसेनेचा सोमवारचा वर्धापनदिन आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाची मंगळवारची वर्षपूर्ती या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांत कलगीतुरा रंगला आहे. ‘माता-भगिनींवर कोणी हात उचलला तर तो हात जागेवर ठेवू नका’ असा आदेश ठाकरे यांनी रविवारच्या वरळीतील मेळाव्यात शिवसैनिकांना दिल्याने दोन्ही गटांतील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे गटाला धक्का देणारी एक घटना शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला घडली. विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ अशी झाल्याचा टोला लगावला.
शिवसेना ठाकरे गटाच्या वरळीत रविवारी झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात शिंदे यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली. २० जून हा जागतिक खोके दिन असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली, तर ‘उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आणि परवा जागतिक गद्दार दिन’ असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढविला. शिवसेनेचा सोमवारचा ५७वा वर्धापनदिन एकमेकांना शह देत तोडीसतोड साजरा करण्याचे ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रयत्न असतील. तर एकनाथ शिंदे यांच्या बंडाची मंगळवारी वर्षपूर्ती होत आहे. या योगायोगांच्या निमित्ताने दोन्ही गटांत शाब्दीक संघर्षांची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १० ते १२ आमदारांनी गेल्या वर्षी २० जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडताच रात्री ठाणे मार्गे सूरत गाठले होते. त्याच दिवशी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार गडगडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळेच ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे यांचा गद्दार असा वारंवार उल्लेख करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाने वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदार आणि पक्ष प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. कायंदे यांच्यासह ठाकरे गटाचे काही आमदार आणि पदाधिकारी लवकरच शिंदे गटात सामील होतील, असे शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिवसेनेच्या विधानसभेतील ४० आमदारांनी एक वर्षांपूर्वी बंड केले. परंतु विधान परिषदेतील शिवसेना पक्षात फूट पाडण्यात शिंदे गटाला यश आले नव्हते. पण विप्लब बजोरिया यांच्यानंतर कायंदे आता शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांची पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. यातूनच ठाकरे गट गेले वर्षभर फडणवीस यांना लक्ष्य करीत होता. पण रविवारच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या वादग्रस्त जाहिरातीवरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर मार्मिक टीका केली.जाहिरातीवरून फडणवीस यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी झाली आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला. समान नागरी कायद्यावरून फडणवीस यांनी ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असता ठाकरे यांनी समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे सांगत देशात समान वागणूक कायदा आणा, असा सल्ला फडणवीस यांना उद्देशून दिला. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत, असा सवालही ठाकरे यांनी केला.
फडणवीसांना सहनही होत नाही.. : ठाकरे
एका जाहिरातीवरून फडणवीस यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी झाली आहे. समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे, पण देशात समान वागणूक कायदासुद्धा आणा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत, असा सवालही त्यांनी केला.