मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे.  दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’ तपास करत आहे.

इक्बाल मिर्ची याच्या पत्नीशी २०१९ मध्ये करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याच्या कुटुंबियांशी वरळीतील या जागेसंदर्भात व्यवहार करण्यात आला होता. ही जागा वरळीमधील नेहरू तारांगणाच्या जवळ आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असून, या इमारतीच्या चार मजल्यांवर ‘ईडी’ने टाच आणली आहे.  आपले कुटुंब तसेच ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या इक्बाल मेमन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत एका पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी २०१९ मध्ये स्पष्टीकरण दिले होते. हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता, असे प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. जमिनीचा इतिहास सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी कशाप्रकारे ही वादग्रस्त जमीन १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीमार्फत इक्बाल याला विकली असल्याचे सांगितले होते. इक्बाल मेमनशी २००४ मध्ये जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार महानिबंधकांच्या समोर झाला. सर्व कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. इक्बाल मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता,’’ असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. संबंधित जागा पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्यापूर्वी ती जागा इक्बाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती. या व्यवहाराबाबत ईडी तपास करत आहे. यापूर्वी या इमारतीतील मिर्ची कुटुंबियांशी संबंधीत दोन मजल्यावर ईडीने टाच आणली होती.

Story img Loader