महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणातील कारवाई थांबण्याची चिन्हे नाहीत. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं आत्तापर्यंत ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ED समोर हजर झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज अंमलबजावणी संचालनालय (ED) अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी मांडली होती. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती. “माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे”, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
#UPDATE | Enforcement Directorate (ED) files a chargesheet against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s aides Kundan Shinde and Sanjeev Palande in an alleged money laundering case. #Mumbai
— ANI (@ANI) August 23, 2021
“….तोपर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही”; अनिल देशमुखांनी अखेर सोडलं मौन
ईडीची छापेमारी…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.