आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रकरणी तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन मागितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात धाव घेतली. अनिल देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी १० जून रोजी एक दिवसाच्या जामिनावर मुक्तता करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. अनिल देशमुख यांनी न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे की, कायमस्वरूपी आमदार असल्याने अर्जदार (देशमुख) हा राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा सदस्य आहे.
न्यायालयाने ईडीकडे मागितले उत्तर
न्यायालयाला सांगण्यात आले आहे की, ‘अर्जदाराला आपला मतदानाचा हक्क पूर्ण करायचा आहे आणि मतदान करायचे आहे. या अर्जात असे नमूद करण्यात आले आहे की, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात मतदान विधानभवनाच्या आत होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या एस्कॉर्टची कमतरता भासणार नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश के के पाटील यांनी शुक्रवारी ईडीला देशमुख यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार आहे.
दरम्यान, तडजोडीचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याने राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना की भाजपाचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होणार याचीच आता उत्सुकता आहे. महाविकास आघाडीला १६ तर भाजपाला अतिरिक्त २० मतांची आवश्यकता असल्याने जास्त आमदार कोण अधिक ‘गळा’ला लावतील त्यावरच दोन्ही पक्षांचे भवितव्य ठरेल.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा, त्याबदल्यात विधान परिषद निवडणुकीत भाजपाला अतिरिक्त जागा देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने छगन भुजबळ, अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतली. भाजपाने हा प्रस्ताव फेटाळल्याने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अटळ ठरली आहे.