शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी पुढील महिन्यात होणारी पोटनिवडणूक ‘अर्थ’पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंकडून हात धुवून घेण्याची संधी साधली जाईल अशी चर्चा आहे.  
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाल्याने शिवसेनेचे विनायक राऊत यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी २१ ऑगस्टला पोटनिवडणूक होणार असून, ४ ते ११ ऑगस्ट या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. एका जागेसाठी मतदान असल्याने पसंतीक्रमानुसार मतदान नसून, बहुमताने निवड होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने आघाडीचा उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. परंतु या पोटनिवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीत कोणी ही जागा लढवायची यावरून वाद होण्याची शक्यता आहे. कारण २०१२मध्ये राऊत निवडून आले होते तेव्हा काँग्रेसने ती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एक उमेदवार उभे करण्याचे टाळले होते. परिणामी या जागेवर हक्क असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातो. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली कटुता लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सहजासहजी मान्य करणार नाही. त्यातूनच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असला तरी तो सहजपणे निवडून येण्याची शक्यता धूसरच असू शकते.  मध्यंतरी झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत पूर्ण बहुमत असतानाही काँग्रेसच्या मधू जैन अवघ्या सहा मतांनी विजयी झाल्या होत्या. सत्ताधारी आघाडीची तेव्हा मोठय़ा प्रमाणावर मते फुटली होती. विजय मिळणार हे गृहीत धरून तेव्हा भाजपने फटाके आणि बॅण्डबाजा आणला होता. विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने कोणीच संधी सोडणार नाही. यामुळे आर्थिकदृष्टय़ा सक्षम अशी पाश्र्वभूमी असलेला एखादा बडा रिंगणात उतरल्यास अपक्ष, छोटे पक्षांबरोबरच राजकीय पक्षांचे आमदारही गळाला लागण्याची शक्यता आहे. आमदारकीसाठी चार वर्षांची मुदत शिल्लक असल्याने बडे प्रस्थ रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा