अक्षय मांडवकर
एकेकाळी १० गाडय़ांचा ताफा असलेल्या मोनोच्या बहुतांश गाडय़ा नादुरुस्त झाल्याने चालविण्यायोग्य असलेल्या तीन गाडय़ांच्या बळावर चेंबूर ते वडाळा या दरम्यानचा गाडा ‘मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणा’ला (एमएमआरडीए) हाकावा लागत आहे. गेल्या आठवडय़ात ‘एमएमआरडीए’कडून मोनो प्रकल्प ताब्यात घेण्यात आला. त्यापूर्वीच सेवेत असलेल्या चार गाडय़ांपैकी एक गाडी बिघडली. त्यामुळे बिघडलेल्या गाडय़ांची संख्या सातवर गेली. त्यापैकी दोन गाडय़ा भंगारात काढाव्या लागणार आहेत. अर्थात गाडय़ा कमी असल्या तरी गेल्या आठवडय़ाभरात मोनोच्या १३० फेऱ्यांचे ध्येय पूर्ण करून सेवेत वक्तशीरपणा आणल्याचा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे.
ढिसाळ व्यवस्थापन आणि प्रकल्पाला आर्थिक डबाघाईच्या परिस्थितीत आणल्याचे कारण देत ‘एमएमआरडीए’ने १४ डिसेंबर रोजी स्कोमी कंपनीला मोनो प्रकल्पातून हद्दपार केले. त्यानंतर ‘प्रकल्प अंमलबजावणी युनिट’ (पीआययू) स्थापन करून प्राधिकरणाने मोनोच्या संचलनाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली. १० महिन्यांनंतर सप्टेंबर महिन्यात चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यावर चार गाडय़ांच्या आधारे मोनो सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र ‘एमएमआरडीए’ने गेल्या आठवडय़ात प्रकल्प ताब्यात घेतल्यापासून केवळ तीन गाडय़ांच्या आधारे सेवा सुरू आहे. प्रकल्प ताब्यात घेण्यापूर्वीच डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चारपैकी एका गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने स्कोमीने त्या गाडीला डेपोत धाडल्याची माहिती मोनो प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे डेपोत नादुरुस्त असलेल्या गाडय़ांची संख्या सात झाली असून त्यापैकी दोन गाडय़ा भंगारात काढाव्या लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोनपैकी एक गाडी म्हैसूर स्थानकात लागलेल्या आगीमुळे पूर्णपणे बिघडली आहे, तर दुसरी गाडी तांत्रिक कारणास्तव दुरुस्त करण्याजोगी राहिलेली नाही. त्यामुळे या गाडय़ांची विमा रक्कम मिळवून त्यांना भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तो अधिकारी म्हणाला.
उत्पन्नात मात्र वाढ
केवळ तीन गाडय़ांच्या बळावर गेल्या आठवडय़ाभरात प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविल्याचा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे. प्रकल्प स्कोमीकडे असताना प्रति आठवडा प्रवाशांची संख्या सरासरी ७८,०००च्या घरात होती, तर उत्पन्न सरासरी साडेपाच लाखांच्या घरात होते. मात्र प्रकल्प ताब्यात घेतल्यापासून आठवडय़ाभरात प्रवासी संख्या १,०८,४२० झाली असून त्याद्वारे ७,३५,१७५ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती शुक्रवारी प्राधिकरणाने दिली. हे वक्तशीरपणातून साध्य केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बिघाड झालेली गाडी सेवेतून हद्दपार केल्यानंतर सेवा सुरळीत झाली असल्याने प्रतिदिवशी १३० फेऱ्यांचे ध्येय पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.