वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेला अंतिम सुरक्षाप्रमाणपत्र मिळण्यासाठीची पूर्वअट असलेले ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) या रेल्वेच्या संस्थेचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘आरडीएसओ’ने हिरवा कंदील दाखवल्याने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मेट्रो रेल्वेची अंतिम सुरक्षा चाचणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. मेट्रो रेल्वे सुरू होण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याआधी ‘आरडीएसओ’च्या चाचणी परीक्षेत मेट्रो रेल्वेला यशस्वी होणे अत्यावश्यक
होते.
मेट्रो रेल्वे आपल्या रुळांवरून व्यवस्थित धावते की नाही, तिचा प्रवास सुरक्षित आहे की नाही, विविध परिस्थितीत मेट्रो रेल्वेसाठी आणलेल्या गाडय़ा योग्यरित्या चालतात-थांबतात की नाही अशा नानाविध चाचण्या फेब्रुवारीत ‘आरडीएसओ’च्या पथकाच्या देखरेखीखाली पार पडल्या. त्यानंतर आता ‘आरडीएसओ’ने सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे.

८० किमी वेगाची प्रतिक्षा
मेट्रो रेल्वेचा सरासरी वेग ताशी ३५ किलोमीटर असेल. दोन स्थानकांमधील अंतर फारसे नसल्याने ताशी ८० किलोमीटर हा कमाल वेग सरसकट गाठता येणार नसला तरी घाटकोपर-जागृती नगर दरम्यान त्यासाठी पुरेसे अंतर असल्याने कदाचित या ठिकाणी ८० किलोमीटरचा वेग गाठण्याची परवानगी आता अंतिम सुरक्षा प्रमाणपत्रावेळी ‘आरडीएसओ’च्या शिफारशीनुसार मिळू शकेल, असे ‘रिलायन्स’च्या प्रवक्त्याने सांगितले.

Story img Loader