प्रवासी नसल्याने उत्पन्नवाढीसाठी वेगळे प्रयत्न

अक्षय मांडवकर, मुंबई</strong>

वर्सोवा-घाटकोपर या मेट्रो-१च्या धर्तीवर ‘मोनो’च्या उत्पन्नातही जाहिरातीच्या मदतीने भर घालण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे. याअंतर्गत मोनो प्रकल्पातील गाडय़ा, खांबे आणि स्थानके खासगी जाहिरातदारांसाठी खुले करण्यात येणार आहेत. तोटय़ात चालणाऱ्या या प्रकल्पाला आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या पद्धतीच्या उपाययोजना अमलात आणण्याच्या प्रयत्नात प्राधिकरण आहे. या पाश्र्वभूमीवर जाहिरातदारांना आमंत्रित करून मोनोच्या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाला उभारी देण्याच्या प्रयत्न होणार आहे. मात्र एकीकडे प्रवासी वाढीसाठी मोनो प्रशासन झगडत असताना जाहिरातदार तरी या प्रकल्पाकडे आकर्षित होतील का, असा प्रश्न आहे.

चेंबूर ते वडाळा या भारतातील पहिल्यावहिल्या मोनो मार्गिकेमधील ८ किलोमीटरचा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये कार्यान्वित झाला. मोनोचे तांत्रिक व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘स्कोमी’ या मलेशियन कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे सुरुवातीपासूनच मोनोच्या मार्गात अनेक विघ्न आली. त्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर स्थानकात मोनो गाडीला आग लागल्यानंतर ही संपूर्ण मार्गिका दहा महिने बंद होती. त्यानंतर १ सप्टेंबरपासून बंद असलेला पहिला टप्पा पुन्हा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने सुरू केला. परंतु या मार्गावर पूर्वीपेक्षा प्रवाशांची संख्या कमी झाली. मोनो सुरू झाल्यापासून या मार्गावर दररोज सुमारे १८ हजार प्रवासी ये-जा करत होते. मात्र दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मार्गावर रोज सुमारे १० हजार प्रवासीच प्रवास करत आहेत. त्यामुळे ‘एमएमआरडी’च्या तिजोरीत खडखडाट झाला आहे.

या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी मोनोच्या वडाळा येथील कार डेपोच्या जागेचा व्यावसायिक तत्त्वावर वापर करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानंतर आता मोनो गाडय़ा आणि स्थानकांवर जाहिरात करण्यासाठी खासगी जाहिरातदारांना आमंत्रित करण्यात येणार आहे. मोनोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर सहा गाडय़ा धावत आहेत, तर पहिला आणि दुसरा टप्पा मिळून एकूण १७ स्थानके या मार्गिकेवर आहेत. सध्या पहिल्या टप्प्यातील  मोनोचे खांब जाहिरातदारांसाठी खुले करण्याचा विचार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील एका अधिकाऱ्याने दिली. दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यावर त्यावरील स्थानके आणि गाडय़ांकरिता जाहिरातदारांना आमंत्रित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो १ प्रकल्पाला आर्थिक उभारी देण्यासाठी जाहिरात मिळवून देणाऱ्या खासगी संस्थेशी हातमिळवणी करून जाहिरातदारांना आमंत्रित केले आहे.

मोनो प्रकल्पातील गाडय़ा, खांब आणि स्थानकांवर जाहिरात करण्यासाठी जाहिरातदारांना आमंत्रित केले जाणार आहे. जाहिरातदारांचे नियोजन करण्यासाठी एका खासगी संस्थेची कंत्राट पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे.

– संजय खंदारे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Story img Loader