*मोनोराणी..आजपासून मुंबईकरांच्या सेवेत
*मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा
*उद्घाटनानंतर गाडीतून प्रवास करण्यासाठी गर्दी
*अवघ्या वीस मिनिटांचा वडाळा ते चेंबूर प्रवास
*आजपासून मोनो रेल दररोज सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत धावणार.
*वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा ८.९३ किलोमीटरचा.
*किमान तिकिट ५ रुपये, संपूर्ण प्रवास वातानुकूलित. सध्या दर पंधरा मिनिटांनी गाडी.  
*हिरव्या, निळ्या आणि गुलाबी रंगातील आकर्षक डबे.
*वडाळा डेपो, भक्ती पार्क, म्हैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, फर्टीलायझर टाऊनशिप, चेंबूर ही स्थानके.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी देशातील पहिल्या मोनो रेल्वे गाडीला वडाळा डेपोत हिरवा झेंडा दाखविला आणि याच गाडीने चेंबूर रेल्वेस्थानकापर्यंत प्रवासही केला. रविवार पासून सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत ही मोनो रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे मोनो रेल्वेचे उद्घाटन तब्बल अर्धा ते पाऊणतास विलंबाने झाले. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्याच प्रवासासाठी मोनो रेल्वेच्या चार डब्यात प्रचंड गर्दी झाली होती. गाडी सुरू झाली आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, भारत माता की जय’च्या जोरदार घोषणा गाडीतील डब्यांमध्ये घुमल्या.
शनिवारी दुपारपासूनच वडाळा डेपो रेल्वे स्थानकावर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळावरील सुरक्षा तपासणीप्रमाणे वडाळा रेल्वे स्थानकात सर्वाची तपासणी करून रेल्वे फलाटावर सोडण्यात आले. गुलाबी रंगाची ही मोनो रेल्वे झेंडुंच्या फुलांच्या माळांनी सजविली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरण तसेच या रेल्वे प्रकल्पात सहभागी असलेल्या दोन मुख्य कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वर्गही रेल्वे स्थानकावर मोठय़ा संख्येत होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबरच या सर्वानीही गाडीतून प्रवास केला. गाडीच्या सर्व डब्यातून उपनगरी गाडीप्रमाणे तुडुंब गर्दी झाली होती.  मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडी सुरू झाली आणि बघता बघता गाडीने वेग घेतला. गाडीतील सुखद आणि नयनरम्य सजावट, मोठय़ा काचांमधून दिसणारे बाहेरील दृश्य, गाडीत प्रवेश केल्यानंतर आपोआप बंद होणारे दरवाजे हे सगळेच नवलाईचे होते. आपण भारतात किंवा मुंबईत नव्हे तर परदेशातील एखाद्या शहरातील गाडीतून प्रवास करत आहोत, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. रेल्वेच्या या प्रवासात आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या गच्चीवर तसेच गॅलरीत काही जण उत्सुकतेने ही गाडी पाहण्यासाठी उभे होते. खाली रस्त्यावरही अनेक लोक मोठय़ा संख्येने उभे् राहून गाडीची छबी आपल्या कॅमेऱ्यात तसेच भ्रमणध्वनीवर टिपताना पाहायला मिळाले. वडाळा डेपो येथून सुरू झालेल्या या प्रवासाची अवघ्या १५ ते २० मिनिटात चेंबूर येथे सांगता झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा