आठवडाभरापूर्वी केरळच्या किनारपट्टीवर थडकलेला मान्सून बुधवारी रडतरखडत कोकणात दाखल झाला. मात्र, असे असले तरी मुंबईकरांना पावसाच्या धारांसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी मान्सून शहर व परिसरात दाखल होईल असा अंदाज आहे. दरम्यान, अरबी समुद्रात ‘नानौक’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचण्यास मान्सूनला किमान चार दिवस लागणार आहेत. या वादळाची हालचाल किती वेगाने होते, यावर मान्सूनचे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील आगमन अवलंबून असेल.
कोकणात आगमन झाल्यावर पाऊस साधारणत: १-२ दिवसांत मुंबईत पोहोचतो, असा अनुभव आहे. मात्र, २००९ मध्ये पावसाला हे अंतर पार करण्यासाठी तब्बल १४ दिवस लागले होते. त्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. यावर्षी मात्र तो दोन दिवसांत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी व्यक्त केला. फक्त किनारपट्टीवरून सरकत असलेला मान्सून कर्नाटकच्या अंतर्गत भागात आणि आंध्र प्रदेशातही अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे मुंबईत पाऊस पोहोचला तरी राज्याच्या अंतर्गत भागात तो किती पोहोचेल याबद्दल हवामानतज्ज्ञ साशंक आहेत. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत वेगाने वारे वाहत होते. मात्र हा पट्टा किनारपट्टीकडून दूर सरकल्याने बुधवारी संध्याकाळी वाऱ्यांचा जोर ओसरला.     अधिक वृत्त / ३

तापमान ३७ अंश सेल्सिअस
सोसाटय़ांच्या वाऱ्यांमध्ये मुंबईकरांना जाणवले नसले तरी बुधवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३७ अंश से. होते. मंगळवारी नोंद झालेल्या ३८ अंश से. ने शतकातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम प्रस्थापित केल्यावर बुधवारीही तापमान चढेच राहिले.