संध्याकाळी गारव्यासह येणाऱ्या पावसामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी अखेरच्या टप्प्यातील मान्सूनचे हे आणखी एक वैशिष्टय़ असल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून मान्सून माघारी फिरला असला तरी आणखी काही दिवस तो महाराष्ट्रात सक्रिय राहील, असा अंदाज वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळी तापमानात वाढ आणि संध्याकाळी पाऊस व गारवा हा अनुभव गेले दोन दिवस येत आहे. पावसाला नेमके काय होतेय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असला तरी सप्टेंबर महिन्यातील पावसाचे हे वैशिष्टय़ आहे. या काळात सकाळी हवा तापते व संध्याकाळी गार वारे सुटतात. तापमानातील फरकामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली. दरवर्षी कमी-अधिक फरकाने अशा प्रकारे पाऊस पडतो. दरम्यान, राजस्थानमधून मान्सूनचा पाऊस माघारी फिरला आहे. बिकानेर व बारमेरमधून तो बाहेर पडला आहे. मात्र तो महाराष्ट्रातून बाहेर पडण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत आताच काही अंदाज बांधता येणार नाही.
सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पूरक परिस्थिती आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा, तसेच मुंबईत हलक्या सरी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.