केरळहून अवघ्या तीन दिवसांत कारवापर्यंत पोहोचलेला पाऊस दिवसभरात गोव्यातही पोहोचणार आहे. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या अतीतीव्र पट्टय़ामुळे मान्सूनची गाडी पुन्हा अडणार आहे. मान्सूनच्या मार्गातील सर्व पाऊसवारे या पट्टय़ाकडे खेचले गेल्याने मुंबईसह राज्यात मान्सून पोहोचण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.
अंदमान बेटांवर मान्सून वेळेआधीच पोहोचला. त्यानंतर मात्र त्याची गती मंदावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाने तो केरळात येण्याआधी तब्बल १० दिवस अडकून पडला होता. या अडथळ्यांमुळे राज्यातही तो उशिरा दाखल होणार आहे. मान्सूनने सोमवारी केरळ, तामिळनाडू, कर्नाटकची किनारपट्टी व्यापली. कारवारनंतर तो दोन दिवसात राज्यात दाखल होतो. यावेळी मात्र मान्सूनच्या मार्गातील पावसाळी ढगांना अरबी समुद्रातील तीव्र स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टय़ाने खेचून घेतले आहे. हा पट्टा अतीतीव्र स्वरूपाचा होणार असून त्याचा प्रवास पश्चिमेकडे सुरू आहे. या पट्टय़ामुळे मान्सूनचा प्रवास अडण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत मुंबईसह राज्यात पावसाच्या सरी येतील. मान्सूनची संततधार लागण्यास मात्र काही दिवस लागतील, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

यंदा पाऊस कमी?
पुणे : देशात यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैर्ऋत्य मान्सून हा र्सवकष विचार करता जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९३ टक्के राहील. या अंदाजात अधिक उणे ८ टक्के इतकी त्रुटी संभवते. जुलै महिन्यात सरासरीच्या ९३ टक्के तर ऑगस्टमध्ये ९६ टक्के पाऊस राहील, यात अधिक-उणे ९ टक्के त्रुटी गृहीत आहे.