जहांगीर आर्ट गॅलरीत दर पावसाळ्यात भरणारं ‘मान्सून शो’ हे प्रदर्शन हे नुकतंच पदवी/ पदविका शिक्षण संपवून कलाक्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वार्षिक प्रदर्शन. जहांगीर आर्ट गॅलरीतर्फेच ते १९७७ पासून भरवलं जातं, त्यासाठी ठिकठिकाणच्या कला महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची नावं मागवली जातात आणि सहसा उत्तम कलाविद्यार्थ्यांनाच संधी मिळते. राम चटर्जी हे ‘जहांगीर’चे संचालक असताना त्यांनी सुरू केलेली परंपरा सध्याच्या संचालक कात्यायनी मेनन यांनी जपली, त्यामुळे यंदा प्रदर्शनाचं ३८वं वर्ष आहे. शिल्पा गुप्ता, जस्टिन पोन्मणी, प्राजक्ता पालव,  प्राजक्ता पोतनीस, श्रेयस कर्ले अशा आज कलाक्षेत्रात नाव कमावलेल्या कलावंतांनी आपापली चमक (१९९८- २००६ या काळात) ‘मान्सून शो’मध्ये दाखवली होती. गेल्या दहा-बारा वर्षांत या प्रदर्शनाला सुसूत्र स्वरूप आणण्याच्या सद्हेतूमुळे असेल; पण मोठमोठी मांडणशिल्पं वगैरे इथं नसतात. मात्र हल्ली इथल्या चित्र-शिल्पांना बक्षिसं दिली जातात, हा चांगला पायंडा मेनन यांच्या कारकीर्दीत पडला आहे. यंदा ना. श्री. बेंद्रे फाऊंडेशनची पारितोषिकं प्रिया रोंघे आणि तन्वी परब यांना मिळाली आहेत, सूरज नागवंशी हा के. के. हेब्बर पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे, तर प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृत्यर्थ सुरू झालेल्या पारितोषिकाची घोषणा लवकरच होणार आहे. राज्यभरच्या १४ कला महाविद्यालयांतील ६९ निवडक विद्यार्थ्यांचा सहभाग यंदाच्या प्रदर्शनात आहे.

एका भव्यतेची अखेर!

कुलाब्याच्या ‘गॅलरी मस्कारा’ या खासगी (अभय मस्कारा यांच्या) मालकीच्या गॅलरीत आता, या जागेवरलं अखेरचं प्रदर्शन सुरू झालं आहे. पराग सोनारघरे यांचं सहा फुटी कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंगांनी केलेलं चित्रसुद्धा दालनाच्या भिंतीवर लहान वाटावं, इतकं भव्य हे दालन! अखेरच्या प्रदर्शनाची सुरुवात १४ जुलैच्या गुरुवारी झाली, तेव्हा त्या जमलेल्या माणसांहून सुमारे १५ फूट उंचीवर मॅक्स स्ट्रीचर यांची हवेनुसार आकार बदलणारी शिल्पं होती. ती शिल्पं किंवा नरेंद्र यादव यांनी प्रकाश आणि सावली यांचा कल्पक वापर करून बनवलेलं मांडणशिल्प आणि प्रशांत पांडे, मीनाक्षी सेनगुप्ता आदींच्या कलाकृती यांचं हे प्रदर्शन ३१ ऑगस्टपर्यंत पाहता येईल.

‘देना बँक एटीएमजवळ, तिसरी पास्ता लेन, कुलाबा’ या पत्त्यावरल्या या कलादालनात जर आधी

कधी गेलाच नसाल, तरीही मुद्दाम येत्या ४० दिवसांत (रविवार वगळता) जाऊन या.. कलाकृती कमीजास्त प्रमाणात आवडतील; पण खासगी गॅलरी क्षेत्रातल्या एका भव्यतेची अखेर झाली, याची हळहळ अधिक वाटेल.

ही ‘कला’ की ‘कृती’?

कुलाब्यातच, शहीद भगतसिंग मार्गावरून (कुलाबा कॉजवे) रेडिओ क्लबकडे जाणाऱ्या रस्त्याच्या (आर्थर बंदर रोड) टोकाशी ‘कमल मॅन्शन’ या इमारतीत पहिल्या मजल्यावर ‘चटर्जी अँड लाल गॅलरी’ आहे. मॉर्टिमर चटर्जी आणि त्यांच्या सहचारिणी तारा लाल यांनी चालविलेल्या या गॅलरीत सध्या ‘ठुकराल अँड टागरा’ या चित्रकार दुकलीचं प्रदर्शन भरलं आहे. या प्रदर्शनाचा भर कलेपेक्षा कृतीवर आहे, असं प्रथमदर्शनी वाटेल.

गॅलरीत तुम्ही शिरता, तेव्हा भिंतीवर लांबट षट्कोनी आकाराच्या टाइल्स दिसतात. यापैकी काही टाइल्सवर छान नक्षीदार रंगकामही केलेलं आहे.. पण हे ठुकराल व टागरा या जोडीचं अगोदरचं काम. या प्रदर्शनातली खास कला‘कृती’ म्हणजे अशाच षटकोनी टाइल्स ते तुमच्या आठवणी आणि त्यामागल्या भावना यांच्या रंगांमध्ये तिथल्या तिथे तयार करत आहेत!

बुफे जेवणासाठी ठेवलेल्या भांडय़ांसारख्या भांडय़ात ठेवलेलं सिमेंट, त्यात मिसळण्यासाठी रंग, या मिश्रणाला आकार देण्यासाठी षटकोनी साचे, ते सारं हाताळण्यासाठी प्रशिक्षित माणसं.. हे या कलाकृतीचं दुय्यम साहित्य आहे.. पण खरं साधन आहात तुम्ही! आशयसुद्धा तुम्हीच- आणि तुमच्यासारखे अनेक जण- ठरवणार आहेत. कसा काय?

टेबलावर काही कागद ठेवले आहेत. पेनही आहे. कागदावर तुम्ही तुमची कुठलीही आठवण लिहायची.. त्या आठवणीमागे, किंवा ती आठवण काढून स्मरणरंजन करताना आत्ता तुमच्या मनात प्रेम, द्वेष, भीती, दु:ख आदी सहा भावनांपैकी कोणत्या दोन भावना आहेत, हे तुम्हीच त्या भावनांच्या यादीवर ‘टिकमार्क’करून निवडायचं. तुमची आठवण तर अत्यंत खासगीसुद्धा असू शकते.. असेना का! तुम्ही लिहिलेल्या कागदाचे दोन भाग करायचे आहेत- दोन भावनांची निवड केलेला भागच तुमचं नाव लिहून तुम्ही परक्या व्यक्तीच्या हाती देणार आहात आणि उरलेला- आठवणीचा भाग, थेट तिथंच असलेल्या कागदकातरू ‘श्रेडर’ उपकरणात घालून त्याचे कुणालाही वाचता न येण्याइतपत बारीक तुकडे करणार आहात!

हे झालं की, ते तुकडे तुम्ही साच्यात भरायचे. मग त्या साच्यात, तुम्ही निवडलेल्या दोन भावनांचे दोन रंग असलेलं सिमेंट तुमच्याच देखरेखीखाली ओतलं जाणार. ते दोन रंग एकमेकांत किती वा कसे मिसळायचेत हेही तुम्ही सांगायचं.

आता तुमच्या आठवणीमागल्या भावनांची ती षटकोनी टाइल मागच्या फळ्यांवर, घट्ट होण्यासाठी ठेवली जाईल. याच गॅलरीत जर पुन्हा आलात तर अनेक टाइल्समधून तुम्ही स्वत:ची टाइल ओळखू शकाल..

..तसं जर झालं, तर ठुकराल आणि टागरा यांच्या ‘कृती’ला तुम्हीच ‘कले’चा दर्जा बहाल केलेला असेल! आपल्या भावभावना कलाकृतीत पाहण्याचा अनुभव, हा कलानुभवच असतो; ते वर्तुळ तुम्ही पूर्ण केलेलं असेल.. शिवाय, बाकीच्या लोकांनी कोणकोणत्या भावना निवडल्या होत्या हेही तुम्हाला ओळखू येऊ लागेल.. म्हणजेच, ‘कलेतून माणूसपणाची, समाजाची ओळख अधिक पक्की होते’ यासारखा पुढल्या पातळीवरला कलानुभवसुद्धा तुम्हाला आलेला असेल!

व्यक्तिचित्रण विसरू नका..

वांद्रे पश्चिम भागात, रंगशारदा नाटय़गृहाच्या अगदी समोरच असलेल्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या इमारतीत व्यक्तिचित्रणाची परंपरा दाखवणारं मोठं प्रदर्शन सुरू होणार असल्याची माहिती गेल्या आठवडय़ात याच स्तंभातून दिली होती.. ते प्रदर्शन पाहायला विसरू नका! अवश्य पाहावं असं, भारतीय आधुनिक चित्रकलेचा इतिहास माहीत होण्यासाठी मदतच करणारं हे प्रदर्शन आहे.

Story img Loader