मुंबई : प्रवाशांचा रेल्वे प्रवास वेगाने व्हावा यासाठी भारतीय रेल्वेवरून अतिजलद (सुपरफास्ट) रेल्वेगाड्या धावतात. यासाठी तिकीट दरात ‘अतिजलद अधिभार’ आकारला जातो. मात्र, कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकामुळे सुमारे ३२ अतिजलद रेल्वेगाड्यांचा वेग मंदावला आहे. तरीही या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांकडून ‘अतिजलद’ रेल्वेगाडीच्या नावाखाली विनाकारण अतिरिक्त शुल्क घेणे सुरूच आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या काळात रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. परंतु रेल्वे प्रशासनाकडून अतिजलद गाडीच्या निकषांत कोणताही बदल किंवा शिथिलता आणली जात नाही, असे मत कोकण रेल्वे समितीने व्यक्त केले आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वे मंडळ, रेल्वे विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा >>>भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला २५ कोटींची जागा
…असे आहे शुल्क
● मध्य, पश्चिम, कोकण, दक्षिण, पश्चिम मध्य आणि उत्तर पश्चिम रेल्वे या सहा विभागांच्या ३२ रेल्वेगाड्या अतिजलद नसतानाही शुल्क आकारले जात आहे.
● प्रत्येक प्रवाशांमागे तिकीट दरात एक्झिक्युटिव्ह वातानुकूलित, विस्टाडोम, प्रथम श्रेणी वातानुकूलितसाठी ७५ रुपये अतिजलद अधिभार आकारला जातो.
● वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि वातानुकूलित चेअरकारसाठी ४५ रुपये, द्वितीय श्रेणीसाठी १५ रुपये असे अतिजलद शुल्क आकारण्यात येते.