यंदा मान्सून उशिरा येण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्येआणखी सुमारे ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याने तातडीने पाणीकपात करण्यात येणार नाही. अर्थात पाणी जपून वापरण्यावर मात्र कटाक्ष ठेवण्यात येणार आहे.
शहराला मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून पाणीसाठा होतो. यात भातसा, मोडक सागर व अप्पर वैतरणा हे तीन तलाव प्रमुख आहेत. मध्य वैतरणामध्ये गेल्या वर्षीपासून पाणी साठवण्यास सुरुवात करण्यात आली असली तरी त्याची पूर्ण क्षमता वापरण्यात आलेली नाही. यावर्षी ३० मेपर्यंत तलावात उपलब्ध असलेला पाणीसाठा २ लाख ४८ हजार दशलक्ष लिटर असून तो गेल्यावर्षीपेक्षा ८७ हजार दशलक्ष लिटरने अधिक आहे. मोडक सागर येथे ६६,८६९ दशलक्ष लिटर, अप्पर वैतरणा येथे २६,०११ दशलक्ष लिटर तर भातसा तलावात १,१९,२८४ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
शहराला दरदिवशी सुमारे साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणखी ६० दिवस पुरेसा आहे. त्यामुळे यावेळी मान्सूनपूर्व पाणीकपात होणार नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र कमी पावसाचा वेधशाळेचा अंदाज पाहता उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचा प्रशासनाचा विचार आहे. जूनमधील पावसाची परिस्थिती पाहून पाणीपुरवठय़ाबाबत निर्णय घेतला जाईल. त्याचसोबत पालिकेने कृत्रिम पावसाचीही तयारी केली आहे. जून महिन्यात अपुरा पाऊस पडल्यास जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात कृत्रिम पावसाचा प्रयोग करून या तीन प्रमुख तलाव क्षेत्रात पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सोमवारी-मंगळवारी
पाणीपुरवठय़ात २० टक्के कपात
मरोशी ते रुपारेल बोगदा प्रकल्पाअंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पवई ते सहारदरम्यान ९६ इंची व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबई शहर व उपनगरात अनेक भागांत २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
सोमवारी, दोन जून रोजी सकाळी दहा ते मंगळवार तीन जून रोजी सकाळी दहापर्यंत कुलाबा ते मलबार हिल, ग्रँट रोड परिसर, भायखळा, दादर-परळ, सांताक्रूझ, अंधेरी या भागांत पाणीपुरवठय़ात २० टक्के कपात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon may come little late