मुंबई : मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता, केरळमध्ये ४ जून, तर राज्यात १० जूनला पाऊस दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मोसमी वाऱ्याने सलग दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात समाधानकारक वाटचाल सुरू ठेवली आहे. लक्षद्वीप बेटांचा काही भाग आणि दक्षिण श्रीलंकेत शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी वेग घेतल्याचे हवामान विभागाने सांगितले.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच, १९ मे रोजी मोसमी वारे दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाले होते. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली होती. मोसमी वारे गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाले. शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी आणखी वेग धरला. त्यामुळे केरळमध्ये ४ जून, तर कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये ५ जूनपर्यंत मोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच १० जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि तेलंगणमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मोसमी पाऊस दाखल होईपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि सोलापूरमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या मुंबई, कोकण पट्टय़ामध्ये हवेतील आद्र्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे अधिक उकाडा जाणवत आहे.
‘यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊसमान’
राज्यात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी; तसेच खंडित वृष्टी होईल, असा अंदाज कृषी-हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. कमाल तापमान, सकाळ, दुपारची सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी माहितीच्या विविध पंधरा प्रारूपांद्वारे विश्लेषण करून हा अंदाज मांडण्यात आला असल्याचे डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.