६२ वर्षांनंतर मुंबई, दिल्लीत एकाच वेळी मोसमी पावसाचे आगमन | monsoon rains arrive in mumbai delhi simultaneously after 62 years zws 70
वी दिल्ली, मुंबई : दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांमध्ये रविवारी एकाच वेळी मोसमी पावसाचे आगमन झाले. असा दुर्लभ योग ६२ वर्षांपूर्वी २१ जून १९६१ मध्ये जुळून आला होता. राष्ट्रीय राजधानीत मोसमी पाऊस नियोजित वेळेच्या दोन दिवस अगोदर पोहोचला. तर, आर्थिक राजधानीत त्याचे आगमन दोन आठवडे उशिरा झाले, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. ‘आयएमडी’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी सांगितले की, २१ जून १९६१ नंतर पहिल्यांदाच मोसमी पाऊस दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी दाखल झाला.
दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेच्या माहितीनुसार रविवारी सकाळी साडेआठ वाजतापर्यंत गेल्या २४ तासांत ४८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ‘आयएमडी’नुसार जफरपूर आणि लोधी रोडमध्ये सुमारे ६०-६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने सांगितले की, हरियाणा चंदीगड आणि दिल्ली या भागात मोसमी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने रविवारी सकाळी साडेआठ वाजतापर्यंत २४ तासांत ८६ मिलिमीटर पावसाची नोंद केली. तर, सांताक्रुझ हवामान केंद्राने या कालावधीत १७६.१ मिलिमीटर पावसाची नोंद केली.