मुंबई : निवडणुका आणि कडक उन्हाळा यांमुळे मुंबई आणि परिसरातील पर्यटन स्थळांचा सुट्टीचा हंगाम काहिसा थंड झाला असला तरी आता मोसमी पावसाने पर्यटन व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. गेला आठवडाभर दिवसभरातून एकदातरी हजेरी लावणाऱ्या पावसाने परिसर हिरवागार झाला आहे, त्याचबरोबर पर्यटकांनीही परिसर फुलून गेला आहे. परिणामी, दर आठवडा अखेरीस हॉटेल आणि फार्म हाऊस १५ टक्के अधिक किंमतीने आगाऊ आरक्षित करण्यात आले आहेत. वाढते तापमान आणि लोकसभा निवडणूकीमुळे अलिबाग, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, पालघर आणि वाडा आदी ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत पर्यटकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, मोसमी पाऊस स्थिरावताच आठवडा अखेरीस पर्यटकांची पावले जवळपासच्या पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी हॉटेल्स, फार्महाऊस, रिसॉर्ट्सच्या भाडे दरात १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

पुणे आणि मुंबईच्यामधील लोणावळ्यात मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त गुजरात येथूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लोणावळ्यात शनिवार ते सोमवार पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे लोणावळ्यामधील हॉटेल, रिसॉर्ट आणि शेतघरे आगाऊ आरक्षित करण्यात आले आहेत. मे महिन्यातील पर्यटकांच्या कमी प्रतिसादानंतर जून महिन्यात पर्यटकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी राहील असे ‘सनराईस रिसॉर्ट’चे इस्माईल यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई : पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर चाकूहल्ला

मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे अलिबागमध्ये मे महिन्यात पर्यटकांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर देखील फरक पडला. परंतू, जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांचा प्रतिसाद सुट्ट्यांअभावी जुलै महिन्यात थोडा कमी होईल. परंतु, त्यानंतर वाढेल असे अलिबागच्या स्टार्टलाइट रिसॉर्टचे रुपेश शेवले यांनी सांगितले.

हेही वाचा…निवासी डॉक्टर आक्रमक, सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने ‘मार्ड’चा आंदोलनाचा इशारा

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून दरवर्षी महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला येत असतात. पण यावर्षी जून महिन्याच्या मध्यापासूनच पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. या मोठ्या आठवडी सुट्टीमुळे महाबळेश्वरमधील अधिकतर हॉटेल आगाऊ आरक्षित करण्यात आली होती. त्यामुळे या पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. – स्वप्नील सकपाळ, हॉटेल सुरभि, महाबळेश्वर