अकरा दिवसांच्या विश्रामानंतर आगेकूच; अंदमान ओलांडून पुढच्या प्रवासाला सुरुवात
मुंबई / पुणे : बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांवर गेल्या अकरा दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मोसमी पावसाने वाऱ्यांच्या वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात प्रवेश केला आहे. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे अरबी समुद्रात दाखल होतील आणि चार जूनच्या आसपास केरळमध्ये धडकतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन होण्यास किमान दहा दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे यंदा १९ मे रोजी बंगालच्या उपसागरासह निकोबार बेटावर आगमन झाले होते. मात्र, वाऱ्यांचा वेग पुरेसा नसल्याने पावसाचा पुढील प्रवास थांबला होता. गेले अकरा दिवस तेथेच घुटमळत असलेल्या मोसमी वाऱ्यांनी उत्तर वायव्य दिशेने आगेकूच केली आहे. अंदमान निकोबार बेटे व्यापून मोसमी पावसाने मध्य पूर्व ब्ंगालच्या उपसागरात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अरबी समुद्रातील आगमनास सध्या पोषक हवामान असून, दोन दिवसांत मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
दरवर्षी साधारणपणे २२ मे रोजी मोसमी पाऊस अंदमान व्यापतो. यंदा त्याला आठ दिवसांचा विलंब झाला असून पुढील प्रवासही विलंबाने होणार आहे. यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन सर्वसाधारण तारखेपेक्षा तीन दिवस उशिरा, म्हणजे ४ जूनला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने या पूर्वीच वर्तवला आहे. मात्र जूनच्या पहिल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढल्यास मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
जून कमी पावसाचा?
मोसमी पावसाच्या आगमनाला यंदा विलंब होणार असून देशातील काही भागांत जूनमध्ये कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच हवामानशास्त्र विभागाच्या सुधारित अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असे गणित मांडण्यात आले आहे.