मुंबई, पुणे : अनुकूल वातावरणामुळे दोन दिवसांपासून आगेकूच करीत असलेल्या मोसमी पावसाने द्रुतगती घेत शनिवारी (११ जून) थेट मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मजल मारली. पुढील ४८ तासांत त्याची आणखी प्रगती होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोसमी पाऊस दाखल झाल्याने कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित सर्व महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाच्या प्रवासाला गुरुवारपासून (९ जून) चालना मिळाली. पोषक वातावरण तयार झाल्याने १० जूनला त्याने गोवा ओलांडून दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला होता. पालघरमधील डहाणूपासून मध्य महाराष्ट्रातील पुणे, कर्नाटकातील गदग, बंगळुरु अशी सध्या मोसमी पावसाची सीमा आहे.

मराठवाडय़ातही लवकरच..

मोसमी पावसाच्या प्रवासाला सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये तो कोकणातील सर्व भागात प्रवेश करून थेट गुजरातपर्यंत मजल मारणार आहे. दक्षिणेकडील राज्यांतही त्याचा विस्तार होणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मराठवाडय़ाच्या काही भागांत मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी या भागात पूर्वमोसमीची जोरदार हजेरी राहील. बंगालच्या उपसागराच्या बाजूने मोसमी पाऊस या कालावधीत बिहार, झारखंडपर्यंत पोहोचेल.

सद्य:स्थिती..

कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आदी भागांसह मुंबई, ठाणे परिसरात मोसमी पाऊस दाखल झाल्याने या भागांत त्याने शनिवारी जोरदार हजेरी लावली. पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर आदी भागातही मोसमी पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पूर्वमोसमी पाऊस झाला.

पाऊसभान..

कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.