महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने बुधवारी पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचं पहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. मात्र यापूर्वी त्यांनी विधासभेमध्ये स्वप्निल लोणकर आत्महत्याप्रकरणावरुन सदन प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव विधीमंडळाचे अध्यक्ष यांनी फेटाळला. याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी नोटीस न काढताच तरतूद स्थगिती केल्याचं म्हटलं. तसेच नियमावर बोट ठेवत सरकारवर नियम बासनात गुंडाळून ठेवल्याची टीका केली. यावर उत्तर देताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी थेट नाव न घेता केंद्र सरकारला टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा विषय आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि तालिक अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांमध्ये बराचवेळ आरोप प्रत्यारोप झाले. तरतूद स्थगित करायची असेल तर ते कळवायला हवे होते. सात दिवसाची नोटीस देणे बंधनकारक आहे. आधी नियम स्थगित करायला हवा होता. जी सूचना आलेली आहे ती कायद्यात बसत नाही, असं फडणवीस म्हणाले. हा सर्व गोंधळ सुरु असतानाच नोटीस न काढताच सदन प्रस्ताव स्थगित केल्यावर फडणवीसांनी सरकारवर टीका केली. “सकाळपासून ज्या पद्धतीने काम सुरु आहे ते पाहता सगळे नियम बासनात गुंडाळून ठेवलेत असं सुरू राहीलं तर भविष्यातही या गोष्टी सोकावतील आम्हाला टेक्निकॅलिटीमध्ये जायचं नाही पण काळ सोकावतो,” असं फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना, “नियम बासनात गुंडाळता कामा नये. आताच विधेयक मांडा, आताच विधेयके मंजूर करा असा कारभार सुरु आहे. तुम्हाला विरोधकांची गरजच नाहीय. तुम्हाला लोकशाहीची गरज नाहीय,” असं फडणवीस म्हणाले. यावर उत्तर देताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी, “आम्ही पार्लमेंटकडूनच हे शिकलोय”, असं उत्तर भास्कर जाधवांनी दिलं.

आज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावतीने तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी कामकाज पाहिलं. यावेळी भास्कर जाधव यांनी सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आक्रामक पद्धतीने उत्तर देत कारभार हाताळल्याचा आरोप करत भाजपाच्या काही आमदारांनी गोंधळ घातला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon session maharashtra legislative assembly and council session 2021 updates bhaskar jadhav answers to devendra fadnavis scsg