अंदमान समुद्रात दोन-तीन दिवसांत पोहोचणार
बंगालच्या उपासागरात निर्माण झालेल्या ‘महासेन’ चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) भारताकडील प्रवास सुकर केला आहे. त्यामुळेच मान्सून येत्या दोन-तीन दिवसांत अंदमान समुद्रात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तसे झाले तर त्याचे आगमन वेळापत्रकाच्या तीन दिवस आधी झालेले असेल. त्याच्या केरळमधील प्रवासाबाबत मात्र आताच नेमकेपणाने काही सांगता येणार नाही.
निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना सध्या मान्सूनची प्रतीक्षा केली जात आहे. बंगालच्या उपसागरात तीन दिवसांपूर्वी ‘महासेन’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे आता मान्सूनच्या भारताकडील प्रवासाला चालना मिळाली आहे. भारतीय उपखंडातील पहिला मुक्काम असलेल्या अंदमान समुद्रात मान्सून गुरुवार-शुक्रवापर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तो या भागात सामान्यत: २० मेपर्यंत पोहोचतो. त्यामुळे यंदा त्याचे वेळेआधी आगमन होण्याची चिन्हे आहेत, असे पुणे वेधशाळेतील अधिकारी एस. बी. गावकर यांनी सांगितले. मान्सून अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर पुढे १ जूनच्या सुमारास केरळ किनारपट्टीवर पोहोचतो. मात्र,अंदमानात लवकर आल्यामुळे तो केरळातही वेळेआधी दाखल होणार का हे आताच सांगता येणार नाही. त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागेल, असेही गावकर यांनी सांगितले.
चक्रीवादळ गुरुवापर्यंत बांगलादेशात?
बंगालच्या उपसागरातील ‘महासेन’ चक्रीवादळ मंगळवारी दुपारी बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणपासून ४८० किलोमीटर अंतरावर होते. त्यातील वारे ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने फिरत आहेत. हे वादळ ताशी दहा किलोमीटर या वेगाने पुढे सरकत असून, ते गुरुवारी (१६ मे) सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत बांगलादेशच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश व केरळात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, अंदमान-निकोबार बेटांवर ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी?
मान्सूनचे अंदमानात लवकर आगमन होत असल्याने पुढेही त्याची प्रगती चांगली असेल असे गृहीत धरले जात आहे. मात्र, मान्सूनच्या आगमनाचा इतिहास पाहता तो अंदमानात लवकर आला म्हणजे केरळात आणि पुढे महाराष्ट्रातही वेळेआधी पोहोचेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे मान्सूनचे राज्यात आगमन कधी होणार हे पाहण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे, असे गावकर यांनी स्पष्ट केले. सामान्यत: तो ५ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होतो आणि पुढे १५ जूनपर्यंत महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापतो.