मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला असला, तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकून त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यात मोसमी वारे दाखल होतील आणि १७ जूननंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मराठवाडा आणि विदर्भाला पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्या मोसमी वाऱ्यांमध्ये जोर नाही. १७ जूननंतर मोसमी वारे दाखल होऊन मुंबई आणि पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई, कोकण किनारपट्टी आणि गोव्यात आज, मंगळवारी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रातील अतितीव्र चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गोवा, कोकण किनारपट्टी आणि मुंबईत सोमवारी ताशी सुमारे ४० ते ४५ किमोमीटर वेगाने वारे वाहत होते. मंगळवारीवाऱ्यांचा वेग ५० ते ६० किलोमीटर राहील. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या पावसाची शक्यता आहे.
मोसमी वारे सिक्कीम, बिहापर्यंत मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू आहे. सोमवारी तळकोकण, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली. बंगालच्या उपसागरातील मोसमी वाऱ्यांनी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहापर्यंत मजल मारली आहे.