यंदाच्या वर्षांत अत्यंत अनियमित पावसाळा, त्यानंतर सप्टेंबर महिन्यातच सुरू झालेली ‘ऑक्टोबर हीट’ अशा विचित्र वातावरणामुळे कातावलेल्या मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासूनच थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईसारख्या दमट हवामानाच्या शहरात सूर्यास्तानंतर गुलाबी थंडीचा अंमल अनुभवणाऱ्या मुंबईकरांच्या कपाटातील स्वेटर, शाली बाहेर पडल्या असून बोचऱ्या पहाटवाऱ्यांतून सकाळचा फेरफटका घेणाऱ्यांना रस्त्याकडेला धगधगणाऱ्या ऊबदार शेकोटीचा मोह आवरणे अवघड होऊ लागले आहे.
आजकाल तिन्हिसांजा अंमळ लवकरच सुरू होत असल्याने मुंबईच्या रस्त्यांवर अंधारासोबतच थंड हवेच्या लहरी बागडू लागतात. रात्र चढत जाते, तसतसा थंडीचा बोचरेपणाही वाढू लागतो, आणि पंखा, वातानुकूलन यंत्राची घरघर सुरू झाल्याखेरीज एरवी झोपदेखील न लागणारा मुंबईकर दुहेरी दुलयांच्या ऊबेत स्वतला लपेटून घेतो.. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातला हा थंडगार अनुभव पुढे आणखी बोचरा होत जाईल आणि मुंबईतील ‘ख्रिसमस ट्री’वरील नकली बर्फदेखील खऱ्या थंडीच्या अनुभवाचा आनंद देईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईतही दिवाळीच्या दरम्यान चांगलीच थंडी पडायची. गेल्या काही वर्षांत मुंबईत वाहनांची गर्दी वाढली, हिरवाई कमी होत गेली आणि सिमेंटची जंगले वाढू लागली, तसतसा थंडीचा अनुभव कमीकमी होत गेला. यंदा मात्र, मुंबईच्या सर्व अडथळ्यांवर मात करून थंडीने जम बसवायचे ठरविलेले दिसते. गेल्या वर्षीही थंडीने डिसेंबर महिन्यात मुंबईत मुक्काम ठोकला होता. गेल्या वर्षीच्या २७ डिसेंबर रोजी तर अगोदरच्या दहा वर्षांतील सर्वात कमी, म्हणजे ११.४ अंश सेल्सिअस एवढय़ा कमी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतरचा जानेवारी महिनाही असाच छान थंडीत लपेटला गेला.
यंदा मुंबईकरांच्या ठेवणीतल्या शाली, स्वेटर आणि मफलर नोव्हेंबर अंगावर चढले आहेत. सध्या रात्रीच्या वेळी तापमान १८ ते २० अंश सेल्सियस एवढे खाली उतरत आहे. तसेच सकाळीही आल्हाददायक थंडीचा अनुभव मुंबईकरांच्या वाटय़ाला येत आहे. हा अनुभव डिसेंबर महिन्यात अधिकच कडाक्याचा होणार असल्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढली, तर नक्कीच डिसेंबर महिना थंडीचा महिना ठरेल, असा हवामान खात्याचाही होरा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा