शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवण्याच्या नावाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताच भांबावलेल्या शिवसेना नेत्यांनी उघडपणे स्मारकासाठी आग्रह धरला व प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला

महालक्ष्मी रेसकोर्सवर शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत शिवसेना आग्रही असून तसा प्रस्ताव आल्यास सेनेचा त्याला पाठींबा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला मुदतवाढ न देता हा भूखंड पालिकेने ताब्यात घ्यावा आणि तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि थीम पार्क उभारावे, अशी मागणी करणारे पत्र महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले आहे. ‘लोकसत्ता’च्या सोमवारच्या अंकातील ‘शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आता रेसकोर्सच्या भूखंडावर?’ या मथळ्याखालील वृत्ताबाबत विचारले असता उद्धव म्हणाले की, रेसकोर्सवर साकारण्यात येणाऱ्या उद्यानाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची कल्पना कोणी मांडली, तर त्याला शिवसेना पूर्णपणे पाठिंबा देईल.
मुंबई व मराठी माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढलेल्या शिवसेनाप्रमुखांचे नाव या उद्यानास देणे योग्य ठरेल, असे सांगताना उद्धव यांनी देशाच्या सत्तास्थानी असलेल्या गांधी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव या उद्यानास देण्यास कडाडून विरोध केला.
दरम्यान, भाडेपट्टय़ावर मिळालेल्या रेसकोर्सची मुदत येत्या ३१ मे रोजी संपुष्टात येत आहे. मात्र आणखी ३० वर्षांसाठी पालिकेकडून मुदतवाढ मिळेल. त्यामुळे रेसकोर्सची जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडेच राहील, असा विश्वास क्लबचे अध्यक्ष धानजीभाई खुसरो यांनी व्यक्त केला.

लोकहिताचा निर्णय व्हावा
रेसकोर्सची जागा ही पालिकेच्या अधिकारांखाली आहे. पालिका योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. मात्र निर्णय हा लोकहिताचा व्हायला हवा. या प्रकरणी आत्ताच खूप काही बोलण्यासारखे नाही. त्यामुळे या विषयावर अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत़

 

प्रस्तावाचे स्वागत करू
याबाबत कोणताही प्रस्ताव आपण दिलेला नाही. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि
थीम पार्क उभारण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे, असे स्पष्ट करून महापौर सुनील प्रभू म्हणाले की, या उद्यानास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कुणी सादर केला तर त्याचे स्वागत केले जाईल.

Story img Loader