मुंबई व उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनी, बेस्ट आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या तिन्ही वीजकंपन्यांच्या विद्युत सेवांबाबतच्या शुल्कात वाढ करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता नवीन वीजजोडणी घेण्यासाठी १५०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये इतका खर्च येणार
आहे.
नवीन वीजजोडणीचा खर्च, त्याचा अर्जप्रक्रिया खर्च, फेरजोडणी, मीटर चाचणी, नवीन मीटर बदलून देणे यांसारख्या सेवांचे दर सहा वर्षांपूर्वीच्या दरपत्रकानुसार घेतले जात होते. या कालावधीत विद्युत उपकरणे, साहित्याचे दर वाढल्याने या सेवांच्या शुल्कातही वाढ करावी, असा प्रस्ताव या तिन्ही वीजकंपन्यांनी वीज आयोगाकडे दिला होता. त्यावर नुकतीच सुनावणी झाली होती. शुक्रवार वीज आयोगाने या सेवांचे नवीन दर जाहीर केले.
त्यानुसार आता वीजग्राहकांना मुंबईत नवीन वीजजोडणी घेण्यासाठी १५०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये इतका खर्च येणार आहे. तर त्याचे प्रक्रिया शुल्क २५ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. मीटर जळाल्यास वा गहाळ झाल्यास नवीन मीटरसाठी आतापर्यंत ७०० रुपये खर्च येत होता. आता त्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागतील. खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी ५० रुपयांऐवजी १०० रुपये शुल्क भरावे लागेल.

Story img Loader