* सोमवारही घातवार
* प्रवाशांचे प्रचंड हाल, दोन जखमी
मध्य रेल्वेने शनिवार रात्रीपासून सोमवार पहाटेपर्यंत घेतलेल्या २८ तासांच्या ‘महामेगाब्लॉक’ने सोमवारी आणखी चार निरपराध प्रवाशांचा बळी घेतला. मेगाब्लॉकमुळे झालेल्या गर्दीमुळे रविवारीही दोघांना प्राण गमवावे लागले होते. या महामेगाब्लॉकमुळे उपनगरी गाडय़ा तब्बल दीड ते पावणेदोन तास उशिराने धावत होत्या, तर दिवसभरात किमान दोनशेहून अधिक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या.
मध्य रेल्वेने नेहमीप्रमाणे अपघाताचा आणि मेगाब्लॉकचा संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात गाडय़ांमधील गर्दी मेगाब्लॉकमुळे गाडय़ा विलंबाने धावत असल्यामुळेच होती. सोमवारीही गाडय़ांमधील गर्दीमुळे चौघांना आपला जीव गमवावा लागला, तर दोघेजण जखमी झाले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.४५ वाजता दिनेश अजय कदम (२२), व अशोक अंकुश शेलार (३४) हे दोघे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वेगवेगळ्या गाडय़ांतून पडले. राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडीखाली एकजण सापडून मृत्यू पावला. त्याची सायंकाळी उशीरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. सायंकाळी ५.३०च्या सुमारास कांजूरमार्ग येथे आणखी एकजण गाडीतून पडला. त्याचीही ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले. दिनेश कदम हा सांताक्रूझच्या जांभळीनाका परिसरातील आदर्शनगर येथील लॉरेन्स डिसूझा चाळीमध्ये राहणारा आहे. तर अशोक शेलार हा कांजूरमार्गच्या शास्त्रीनगरातील यमुनाबाई निवासमध्ये राहणारा आहे.
कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे याणाऱ्या गाडीतून वीरेंद्र नायडू (१९) आणि जयशंकर जयस्वाल (३५) हे दोघेजण पडले. त्यांना जखमी अवस्थेत ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायडू अंबरनाथ येथे राहणारा असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. तर जयस्वाल दिवा येथे राहणारा असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
गेले सलग तीन दिवस मध्य रेल्वेचा महागोंधळ सुरू आहे. सोमवारी पहाटे २ वाजता हा ब्लॉक संपेल असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ब्लॉक सकाळी ६ पर्यंत सुरूच राहिला. मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरम्यान एक इंजिन बंद पडले तर एका ठिकाणी सिग्नल पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. हे दोष दूर करण्यात विलंब झाल्याने उपनगरी वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी सहा वाजल्यानंतर धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू झाली मात्र ती तब्बल एक तास विलंबाने सुरू होती. त्यातच जलद मार्गावर काही गाडय़ा वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे गाडय़ांना दीड तासापेक्षा जास्त काळ लागत होता. भायखळा ते मस्जिद या दरम्यान गाडय़ांचे अचानक बंचिंग सुरू झाले होते. त्यामुळे सकाळी ११ वाजल्यानंतर काही काळ भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या प्रवासाला ३५ मिनिटे लागत होती.
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून ठाण्याकडे येणाऱ्या गाडय़ा वेळेत आल्या तरी ठाण्याला कर्जत-कसारा येथून येणाऱ्या गाडय़ा विलंबाने येत होत्या. त्यातच ठाणे गाडीसाठी असलेला फलाट आणि तीन क्रमांकाचा फलाट यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने ठाणे लोकल आणि अन्य धीम्या गाडय़ा यांच्या रांगा लागल्या आणि संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा