गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात केल्याने मुंबई विद्यापीठाचा ‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखे’चा (टीवायबीकॉम) निकाल गेल्या वर्षीप्रमाणेच तब्बल ८१ टक्क्यांच्या आसपास लागला आहे.
आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी टीवायबीकॉमच्या निकालात विक्रमी म्हणजे तब्बल १९ टक्क्यांची वाढ झाली होती. यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. उत्तीर्णतेतच नव्हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही जास्त आहे. निकालातील या अनैसर्गिक वाढीचे गमक अर्थातच टीवायबीकॉमच्या नव्या परीक्षा पद्धतीत आहे. ४० टक्के अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली होणाऱ्या खैरातीमुळे विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) वाणिज्य शाखेला प्रथम किंवा द्वितीय वर्षांला प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी येथील प्रवेश रद्द करून मिळेल त्या महाविद्यालयाकडे मोर्चा वळवला होता. त्यामुळे, यंदा टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १० हजारांनी वाढ झाली. गेल्या वर्षी  ६१,१६९ विद्यार्थ्यांनी टीवायबीकॉमची परीक्षा दिली होती. तर यंदा आकडा वाढून ७१,४२० झाला. यापैकी ७०,७७९ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले. त्यापैकी ८१. १३ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४३,०४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच तब्बल ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी ८१.५३ होती. तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी ३९,६२८ होते. म्हणजे यंदा गुणांच्या खैरातीचे प्रमाणही जास्त आहे.
२०११ मध्ये महाविद्यालयाच्या आणि आयडॉलच्या मिळून केवळ १७,९५६ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळविता आली होती. म्हणजेच अंतर्गत मूल्यांकनाची पद्धत आल्यापासून दुपटीहून अधिक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत आहेत. प्रथम श्रेणीतील उत्तीर्णाची संख्या इतकी भरमसाठ वाढल्याने साहजिकच द्वितीय आणि पास क्लासमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी पास क्लास मिळविणारे विद्यार्थी केवळ ६९ होते. यंदाही हा आकडा आहे अवघा १५२५ इतका आहे.
विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी टीवायबीकॉमच्या परीक्षा पद्धतीत विद्यापीठाने आमूलाग्र बदल केले. वर्षांच्या शेवटी १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याऐवजी ६०:४० अशी विभागणी करून परीक्षा व्यवस्थेचे सुलभीकरण करण्यात आले आहे. या पैकी ४० गुण महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनासाठी देण्यात आल्याने त्याची परिणती निकाल वधारण्यात झाली आहे. शिवाय ६० टक्के गुणांच्या लेखी परीक्षेतही बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करून ही परीक्षाही विद्यापीठाने सोपी करून टाकली आहे. त्याचे परिणाम यंदाच्या परीक्षेत दिसून येत आहेत, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टीवायबीकॉम निकाल
श्रेणी        २०११    २०१२    २०१३
प्रथम श्रेणी    १७,९५६    ३९,६२८    ४३,०४९
द्वितीय श्रेणी    १९,००९    ७,६२०    १०,२२७
पास श्रेणी    ७,९८५    ६९    १,५२५
एकूण निकाल    ६२.९६टक्के    ८१.५३टक्के.    ८१.१३टक्के
एकूण विद्यार्थी    ७९,९५६    ६१,१६९    ७०,७७९
अनुत्तीर्ण        २६,९७६    १०,७१८    १२,७४४
(माहितीचा स्त्रोत – विद्यापीठाचा परीक्षा विभाग)