आरोग्य विभागात डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त आहेत. ज्या आरोग्य संचालनालयातून आरोग्य विभागाचा कारभार हाकला जातो तेथे अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच साहाय्यक संचालकांची डझनावारी पदे रिक्त असताना पुढील वर्षांसाठी संपूर्ण राज्यासाठी दुप्पट-तिप्पट नव्हे तर शेकडो पटींनी जादा औषधखरेदी केली जाणार आहे. श्वानदंशावरील लशींप्रमाणेच महत्त्वाच्या प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) खरेदीची ही डोळे पांढरे करणारी आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात अनारोग्याची अनागोंदी सुरू होणार असल्याची भविष्यवाणी तर आरोग्य विभागात कोणी वर्तविली नसावी ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औषधखरेदी करताना रुग्णांची संख्या, त्यांना मागील तीन वर्षांत किती औषधे वापरण्यात आली, तसेच आगामी वर्षांतील गरज लक्षात घेऊन निविदा काढणे अपेक्षित आहे. ‘अ‍ॅन्टिबायोटिक्स’ खरेदीबाबत निविदेतील आकडेवारी पाहता हे फार मोठे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांना याबाबत विचारणा केली असता पुढील वर्षांसाठी अनेक पटींनी जास्त औषध खरेदी करण्यात येत असल्याचे त्यांनी मान्य केले. सामान्यपणे आमच्याकडे असलेल्या निधीचा विचार करून कालपर्यंत औषध खरेदी होत होती. आम्हाला आवश्यक असलेल्या औषधांची हव्या त्या प्रमाणात खरेदी करणे निधीअभावी शक्य होत नव्हते. कालपर्यंत आमच्याकडे औषध नसले तर रुग्णांना बाहेरून आणावे लागत होते. यापुढे एकाही रुग्णालयात बाहेरून औषध मागविण्याची वेळ येणार नाही, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ही खरेदी जास्त दिसत असली तरी ती आवश्यकतेनुसार तीन टप्प्यांत खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे जर गरज नाही असे लक्षात आले तर खरेदी थांबवता येईल.

झाले काय?
आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी तीन एप्रिल २०१३ रोजी काढलेल्या आदेशात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. यात जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णसंख्या व लागणाऱ्या औषधांची गरज मागविण्यात आली होती. सदर आकडेवारीचा आढावा घेऊन पुढील वर्षांसाठीची औषधाची मागणी निविदेच्या माध्यमातून काढणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात गेल्या वर्षी एक मिलीग्रॅमच्या सिफोटॅक्झिमची नऊ लाख ६० हजार इंजेक्शने खरेदी करण्यात आली तर या वर्षी १ कोटी १८ लाख ४६ हजार इंजेक्शने खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. ही खरेदी ११४० टक्के जास्त आहे.

खरेदीचा विक्रम? : गेल्या वर्षी डायक्लोफेनॅक २५ एमजीची तीन लाख ५० हजार इंजेक्शने खरेदी करण्यात आली तर या वर्षी एक कोटी इंजेक्शन खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. अशाच प्रकारे सीफ्रॉक्झिम ७७० एमजी आणि ५०० एम.जी. इंजेक्शनची अनुक्रमे गेल्या वर्षी ६७ हजार आणि एक लाख ८५ हजार खरेदी करण्यात आली तर पुढील वर्षांसाठी १५ लाख आणि १० लाख इंजेक्शने खरेदी करण्यात येणार आहेत. जेंटामायसीन ४० एम.जी. गेल्या वर्षी २० लाख ५० हजार तर पुढील वर्षीसाठी
६३ लाख ९१ हजार खरेदी करण्यात येणार आहे. निविदेतील वीस प्रकारच्या अँटिबायोटिक्स इंजेक्शनच्या पुढील वर्षांसाठीच्या खरेदीची यंदाच्या खरेदीशी तुलना केली असता बहुतेक सर्व गोष्टींची शंभर ते चारशेपट जास्त खरेदी करण्यात येणार आहे.